वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन
डोंबिवली : मोठागाव माणकोली उड्डाण पुलावरून मुंबई, ठाणे किंंवा नाशिककडे जाण्यासाठी विना अडथळा, सुसाट वेगाने जाता येत असल्याने प्रवासी माणकोली पुलावरून जाण्यास पसंती देत आहेत. या पुलाकडे जाण्यासाठी रेतीबंदर येथे रेल्वे फाटक आहे. या फाटकाजवळील अरूंद रस्त्यावर वाहनांच्या दोन्ही बाजुने दररोज संध्याकाळच्या वेळेत रांगा लागतात. रेल्वे फाटकापासूनचे सर्व रस्ते वाहन कोंडीत अडकत आहेत.
डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस या भागात तैनात राहत नसल्याने प्रवासी एक ते दीड तास मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकात अडकून पडतात. अनेक वेळा स्थानिक तरूण मुले पुढे येऊन वाहतूक नियोजनाचे काम मागील काही दिवसांपासून करत आहेत. वाहतूक विभागाने रेतीबंदर रेल्वे फाटक भागात दररोज संध्याकाळी किमान दोन वाहतूक पोलीस या भागात तैनात करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
रेतीबंंदर रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल लवकर रेल्वेकडून बांधून घेण्याची जबाबदारी शासनासह कल्याण डोंबिवली पालिकेची आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची प्रवाशांची आहे. खासदार शिंदे यांनी रविवारी कार्य अहवाल प्रकाशन कार्यक्रमात माणकोली पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे, असे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांनी माणकोली पूल भागातून जाणाऱ्या प्रवाशांच्या समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. रेतीबंदर रेल्वे फाटकात डोंबिवली बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या की या रांगा उमेशनगर, दोन पाण्याच्या टाकीपर्यंत जातात. यामुळे अंंतर्गत रस्त्यावरील वाहने या कोंडीत अडकून पडतात.
रुग्णवाहिका चालकांना कोंडी मुक्त रस्त्याची वाट पाहत बसावे लागते. रविवारी रेतीबंदर रेल्वे फाटकात एक तास वाहने रेल्वे फाटकात अडकून पडली होती. त्यामुळे वाहनांचा रांंगा सम्राट चौकापर्यंंत लागल्या होत्या. मोठागाव बाजुला खाडीपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. एक्सप्रेस निघून गेली तरी अनेक वेळा फाटक लवकर उघडले जात नाही. त्यामुळेही कोंडीत आणखी भर पडत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
मधला मार्ग म्हणून आता बहुतांशी प्रवासी माणकोली पुलाला पसंती देत आहेत. त्यामुळे डोंबिवलीतील माणकोली पूल, अंतर्गत रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली आहे. माणकोली पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाला नसताना डोंबिवली शहर कोंडीत अडकू लागले आहे. प्रत्यक्षात पूल सुरू झाल्यावर डोंबिवली शहर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कोंडीत अडकण्याची चिन्हे आहेत.