ठाणे : आकाश सावला आणि निशांत मानेने पाचव्या गड्यासाठी केलेल्या नाबाद १०८ धावांच्या भागीदारीच्या जोरावर गतविजेत्या मॉर्डन क्रिकेट क्लबने माझगाव क्रिकेट क्लबचा ६ गडी राखून पराभव करत स्पोर्टींग क्रिकेट क्लब आयोजित ६८ व्या शामराव ठोसर क्रिकेट स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावले. माझगाव क्रिकेट क्लबला १७० धावांवर रोखल्यावर अडचणीत सापडलेल्या संघाला विजेतेपदाचा मार्ग दाखवताना आकाश आणि निशांतने ३४.१ षटकात १७१ धावांचे लक्ष्य पार केले.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मॉर्डन क्रिकेट क्लबची अवस्था चार बाद ६३ धावा अशी झाली होती. आघाडीचे फलंदाज ढेपाळल्याने नाजूक परिस्थितीत सापडलेल्या संघाला तारुन नेताना आकाश आणि निशांतने संयमी खेळी करत संघाला सलग दुसऱ्यांदा विजयी करण्यात मोलाची कामगिरी बजावली. आकाशने पाच चौकार आणि एक षटकार ठोकत नाबाद ६५ धावा केल्या. तर निशांत मानेने सात चौकारासह नाबाद ५५ धावा बनवल्या. सुरुवातीच्या पडझडीत रवी विश्वकर्माने ४१ धावा केल्या होत्या. प्रतिस्पर्ध्यांना सुरवातीला धक्के देताना तनिष पाटकरने दोन गडी बाद केले. सिद्धेश दर्डे आणि ओमकार करंदीकरने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
त्याआधी सैफ शेख आणि भाविन दर्जीने प्रत्येकी तीन गडी आणि चंद्रप्रकाश भारद्वाजने दोन गडी बाद करत माझगाव क्रिकेट क्लबला ३८.२ षटकात १७० धावांवर गुंडाळले होते. संघाच्या दिड शतकी धावसंख्येत आग्नेय आदीने ४७ धावांचे योगदान दिले. अदनान अंसारीने ३८ आणि ओमकार करंदीकरने २८ धावा बनवल्या.
संक्षिप्त धावफलक : माझगाव क्रिकेट क्लब : ३८.२ षटकात सर्वबाद १७० ( आग्नेय आदी ४७, अदनान अंसारी ३८, ओमकार करंदीकर २८, भाविन दर्जी ८-१-२८-३, सैफ शेख ८-३५-३ चंद्रप्रकाश भारद्वाज ६-१-२७-२, अदमेर कार्टे ७-२४-१, रवी विश्वकर्मा ६.२- १६-१ ) पराभूत विरुद्ध मॉर्डन क्रिकेट क्लब : ३४.१ षटकात ४बाद १७१ ( आकाश सावला नाबाद ६५ , भाविन दर्जी नाबाद ५५ रवी विश्वकर्मा ४१ , तनिष पाटकर ४-३०-२, सिद्धेश दर्डे ४-१८-१, ओमकार करंदीकर ८-१८-१).