शरद पवारांचा मोदीवर हल्लाबोल
अमरावती: संसदेपासून राज्याराज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुकुमशाही वाढत आहे. या देशात मोदींच्या रुपाने नवीन ‘पुतीन’ तयार होत आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे अशा शब्दात शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला. ते सोमवारी अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
मी अनेक नेत्यांना जवळून पाहिलं आहे, जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मी सगळे पंतप्रधान पाहिले. नेहरुंची भाषणं नवा भारत कसा निर्माण करायचा, यावर असायची. आताच्या पंतप्रधानांच्या भाषणात नेहरु आणि काँग्रेसवर टीका असते. त्यांच्यात दृष्टीकोनाचा अभाव दिसतो, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली.
उत्तर प्रदेशमध्ये खासदार जाहीरपणे बोलतात की, संविधान बदलायचे असेल तर मोदींना मतदान करा. देशात ही जी हुकूमशाही आली आहे त्याला घालवण्यासाठी संविधान मजबूत केलं पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे हा देश सुरक्षित राहिला. त्याचे रक्षण करणे आमचे काम आहे. त्यादृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.
पाच वर्षांपूर्वी निवडणुकीमध्ये मी मतदान करा अशा सभा अमरावतीत घेतल्या आणि नवनित राणांना पाठिंबा दिला. खासदार केले. मात्र, त्यानंतर त्या भाजपाच्या जवळ गेल्या आणि आज भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवित आहेत. जे झाले ते पाहून मी अस्वस्थ होतो. मला खूप वेळा वाटलं की, अमरावतीमध्ये जावो आणि अमरावतीकरांची माफी मागावी, असे शरद पवार यांनी म्हटले. याच मुद्द्यावरुन शरद पवार यांनी अमरावतीकरांची आज जाहीर माफी मागितली.
शरद पवार यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकस भेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीविषयी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. मात्र, मतदान समाधानकारक झाले नाही. गडचिरोलीत 70 टक्के मतदान झाले, नागपूरमध्ये फक्त 54 टक्के मतदान झाले, नागपूरमध्ये फक्त 54 टक्के मतदान झाले, म्हणजे तुम्हाला समजायला हवे. अमरावतीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले पाहिजे, असे आवाहन शरद पवार यांनी मतदारांना केले.
