अमरावती : शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारे, महिलांचा अपमान करणारे, युवकांना बेरोजगार करणारे, दहा वर्षात देश लुटून कंगाल करणारे, हुकूमशहा मोदी सरकार नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणारे भारत सरकार हवेय अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली.

लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी ही लढाई आहे. समाजातील प्रत्येक घटकाला असमाधानी करणाऱ्या मोदी सरकारविरुद्ध देशात असंतोषाची मोठी लाट निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा घेऊन प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या बळवंत वानखडेंना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, अशी कळकळीची विनंती करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. देशात आपल्याला मोदी सरकार नव्हे तर भारत सरकार हवं आहे असे म्हणत, खासदार नवनीत राणांचा हिशोब चुकता करा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलंय.

अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे सभेला संबोधित करत होते. पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही निवडणूक शेतकऱ्यांच्या जीवनमरणाची लढाई आहे. खतांवर 18 टक्के जीएसटी लावून देशाला लुटणारे मोदी सरकार संविधान बदलविण्याचा डाव आखत आहे. मोदींना महाराष्ट्राबद्दल आकस आहे. दहा वर्षात देशाला कंगाल करणारे मोदी सरकार नको, आम्हाला भारत सरकार पाहिजे. शेतकऱ्यांची मुले आत्महत्या करीत आहे. मणिपूर सारख्या घटना घडल्यानंतरही मुनगंटीवार सारखा सांस्कृतिक मंत्री बहीण भावाच्या नात्याबद्दल अभद्र बोलताय. अश्याबद्दल चिक्कार शब्द न काढता भाजप मूग गिळून बसले आहे. दहा वर्षात कवडीचे योगदान न देणारे हे सरकार गद्दारांनाच पाठबळ देऊ शकते. भ्रम, थापाड्यांची लंका म्हणजेच भाजप होय, असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

दरम्यान, हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी चांगले वातावरण निर्माण केल्याबद्दल अमरावतीकरांना धन्यवाद देत, या नौटंकीबाजांना पराभूत करून बदला घेण्याचे आवाहन शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केलंय .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *