स्वाती घोसाळकर
अमरावती : एकीकडे कडक उन्हाने अवघ्या महाराष्ट्राला घायकुतीला आणले असतानाच दुसरीकडे निवडणूकीचा ज्वर महाराष्ट्रात दिवसागणिक वाढू लागलाय… या निवडणूकीच्या सभेवरूनच अमरावतीतील राडा अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. आली लहर केला कहरच्या थाटात प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षाचे बच्चू कडू आणि आता भाजपामध्ये नव्याने दाखल झालेल्या राणा कुटुंबियांनी आज प्रशासनाला वेठीस धरले. या दोघांच्या लहर आणि कहरपुढे अमरावतीचे प्रशासन हतबल झालेले अवघ्या महाराष्ट्राने पाहिले.
त्याचे झाले असे की येत्या २३ आणि २४ एप्रिलसाठी अमरावतीच्या सायन्स कोर मैदान बच्चू कडूंच्या प्रहारने सर्व नियमांची पुर्तता करीत आरक्षित केले होते. प्रहार पक्षातर्फे दिनेश बूब हे भाजपाच्या नवनित राणांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत. पण एनवेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची नवनित राणांसाठी याच मैदानावर सभेचे नियोजन करण्यात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने परस्पर बच्चू कडूंच्या पक्षाला दिलेली परवानगी रद्द केली आणि ती अमित शहांच्या सभेसाठी भाजपाली दिली. नवनित राणांच्या प्रचारासाठी शेवटच्या क्षणी आमच्या सभेची परवानगी रद्द करणे हा आमच्यावर अन्याय आहे अशा शब्दात बच्चू कडूंनी भाजपावर प्रहार केला. तर देशाचे गृहमंत्री अमित शहा येत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडूंना दिलेली परवानगी रद्द करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकारी गणेश शिंदे हे कडूंना देत होते. यावर नवनित राणांसाठी प्रशासन पायघड्या पसरतेय अशी टिका कडू यांनी केली. भाजपाला जर नवनित राणांसाठी सभा घ्यायचीच आहे तर दुसरीकडे घ्यावी आमच्याकडे परवानगी असतानाही तुम्ही ती रद्द करून भाजपाल का देता असा सवाल बच्चू कडू यांनी पोलिस अधिकारी शिंदे यांना विचारला. पोलिस वर्दीपेक्षा तुम्ही गळ्यात भाजपाचे दुपट्टे घालून या अशा शब्दात बच्चू कडू यांनी पोलिसांना सुनावले. इतकेच नव्हे हवे तर सभेसाठी हवे तर तुमच्या पाया पडतो असे म्हणत राजू शेट्टी यांच्यासह अनेकांनी चक्क पोलिस अधिकाऱ्यांचे पाय धरले आणि एकच गोंधळ उडाला. प्रकरण हाताबाहेर जाणार असे वाटत असतानाच पोलिस अधिकाऱ्यांनी संयमाने यातून मार्ग काढण्याचे आव्हान बच्चू कडू यांना केले. यावर आम्ही ५ एप्रिल २४ रोजीची २३ आणि २४ च्या सभेसाठी हे मैदान पैसे भरून आरक्षित केले होते. केवळ अमित शहा येणार म्हणून तुम्ही आम्हाला सभा घेऊ देणार नाही हा आचारसंहितेचा भंग नाही का असे सवालही बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केले. या प्रश्नांना पोलिस अधिकारी शिंदेंकडे कोणतीच उत्तरे नव्हती. शहांच्या सुरक्षेसाठी आपली परवानगी रद्द करीत असल्याचे शिंदे सारखे म्हणत होते. यावर सुरक्षेचा प्रश्न असेलतर त्यांनी दुसरे मैदान घ्यावे आमच्या उमेदवाराची सभा रद्द करून भाजपाच्या उमेदवाराची सभा तुम्ही कशी काय् घेऊ देता असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
अमित शाह यांची उद्या सभा होणार असल्यामुळे याठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस आपले ऐकत नाहीत, हे पाहिल्यानंतर बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाने दिलेले परवानगीचे पत्र पोलिसांसमोरच फाडून टाकले. पोलिसांनी आपल्या गळ्यात भाजपाचा पट्टा घालावा आणि गाडीवर भाजपाचे झेंडे लावावेत, अशीही टीका बच्चू कडू यांनी केले. भाजपाच्या सांगण्यावरून पोलीस काम करत असून आम्हाला मैदानाबाहेर काढले जात आहे, असाही आरोप बच्चू कडू यांनी केला.