कल्याण : कल्याण, डोंबिवलीत मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचार करत आहेत. या प्रचारासाठी उमेदवार, पदाधिकाऱ्यांकडून अधिक संख्येने वाहने वापरली जात आहेत. ही वाहने कार्यक्रम स्थळी, प्रचार कार्यासाठी शहरात वाट्टेल तशी उभी करण्यात येत असल्याने कल्याण, डोंबिवलीत काही दिवसांपासून राजकीय कोंडी सुरू आहे.

या राजकीय वाहनांच्या कोंडीने वाहतूक पोलीसही हैराण आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाग आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार आणि त्यांच्यामागे प्रचारासाठी ३० ते ४० वाहने असा ताफा दररोज शहराच्या विविध भागातून मतदार, ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांच्या भेटीगाठीसाठी फिरत आहेत. ही वाहने उमेदवार, नेता ज्या ठिकाणी थांंबेल तेथे रस्त्याच्या कडेला थांंबवली जातात. उमेदवार, नेता तेथून पुढे जात नाही तोपर्यंत वाहनेही जागीच खोळंंबून राहतात. या कोंडीत मग मुख्य रस्त्यावरील प्रवासी वाहतुकीची रिक्षा, बस, खासगी वाहने अडकून पडतात.

मागील काही दिवसांपासून कल्याण, भिवंडी, डोंबिवली शहरांमध्ये हे राजकीय वाहन कोंडीचे प्रकार सुरू असल्याने मतदान करू पण तुमचा वाहनांमधील प्रचार आवरा, असे नागरिक संतप्त होऊन बोलत आहेत. भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार एकावेळी ३० हून अधिक वाहने घेऊन शहरांमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. ही वाहने प्रवाशांची मोठी डोकेदुखी झाली आहे.

डोंबिवलीत सोमवारी एक उमेदवार प्रचार कार्यासाठी फिरत होता. पाठीमागे २५ हून अधिक वाहने होती. ही वाहने डोंबिवली पश्चिमेत भावे सभागृहाजवळ एका ज्येष्ठ व्यक्तीला भेटण्यासाठी थांबली, त्याचवेळी पाठीमागच्या सर्व गाड्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या करण्यात आल्या. यावेळी याभागात अर्धा तास वाहन कोंडी झाली होती. उमेदवारांनी किमान संंध्याकाळच्या वेळेत प्रचारासाठी शहरात वाहने घेऊन फिरू नये अशी प्रवाशांंची मागणी आहे. नोकरदार वर्ग या वेळेत कामावरून घरी परतत असतो. त्याचवेळी प्रचाराची वाहने रस्त्यावर आली की अर्धा ते एक तास वाहने कोंडीत अडकतात, अशा तक्रारी आहेत.

आम्ही या परिस्थितीला काही करू शकत नाही. आहे त्या परिस्थितीमधून मार्ग काढून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *