साडेपाचशेहून अधिक पथकांचे 24×7 काम सुरु
जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती
मुंबई : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा 16 मार्च 2024 रोजी करण्यात आली. त्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात साडेपाचशेहून अधिक पथके अहोरात्र 24×7 असे काम करीत आहेत. लोकसभेच्या चारही मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी, यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले.
जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांनी सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यावेळी त्यांना जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीची माहिती दिली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) तेजस समेळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले की, 26 एप्रिलपासून निवडणूकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि एक मे या सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज भरण्याची मुदत 3 मेपर्यंत असून 4 मे रोजी अर्जाची छाननी होईल. दिनांक 6 मेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 20 मे रोजी मतदान आणि 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज भरु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जासोबत भरावयाची माहिती, त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे याची माहिती करुन घ्यावी. याबाबत काहीही शंका असल्यास संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
पाचपेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी एकाचवेळी गर्दी होणार नाही, यासाठी मतदान केंद्रस्तरीय आराखडा तयार करण्यात आला आहे. कमीत कमी वेळात मतदार मतदान करुन मतदान केंद्राच्या बाहेर पडेल, असे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी तेथील विविध मतदार केंद्रांना कलर कोड देण्याची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याशिवाय, त्यासाठी मतदारांना सहाय्य करण्यासाठी मतदारदूत यांची नेमणूक केली जाणार आहे.
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणार
निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये व्हीडिओ सनियंत्रण पथक, स्थिर सनियंत्रण पथक, व्हीडिओ व्हिविंग पथक, भरारी पथकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील 26 विधानसभा मतदारसंघात या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी साडेपाचशेहून अधिक पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके 24×7 आचारसंहिता भंग होणार नाही यासाठी दक्ष आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणुका निष्पक्ष आणि शांततेच्या वातावरणात होतील यादृष्टीने जिल्हा निवडणूक यंत्रणेने पावले उचलली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.
मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न
जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य सरासरी इतके मतदान व्हावे यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय, मतदानाच्या दिवशी मतदारांना कमीत कमी वेळेत मतदान करुन परत जाता यावे, यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, जेथे शक्य असेल तेथे बैठक सुविधा, मतदान केंद्रांवर दिशादर्शक असणार आहेत.
येत्या दोन दिवसात निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात येणार
मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघासाठी 6 खर्च निरीक्षक, 4 जनरल निरीक्षक आणि कायदा व सुव्यवस्था यासाठीचे 2 निरीक्षक भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केले आहेत. येत्या 2-3 दिवसात खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल होऊन निवडणूक प्रक्रिया आणि खर्चाचा आढावा घेतील.