रमेश औताडे
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने सी विजिल हे (cVIGIL) हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात 16 मार्च 2024 पासून ते आज पर्यंत 245 तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील 135 तक्रारींचे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली.
आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगा समोरचे मुख्य उद्दीष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या 100 मिनीटात कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी- व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून 135 तक्रारींचे निवारण केले. शंभर मिनिटांपेक्षा थोड्या जास्त कालावधीत उर्वरित 183 तक्रारीचा निपटारा करण्यात आला.
जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.
सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारींचे स्वरूप
अंधेरी पूर्व-16, अंधेरी पश्चिम-8, अणूशक्तीनगर-7, भांडूप पश्चिम-5, बोरीवली-13, चांदिवली-26, चारकोप-14, चेंबुर-14, दहिसर-8, दिंडोशी-5, घाटकोपर पूर्व-3, घाटकोपर पश्चिम-2, गोरेगाव-10, जोगेश्वरी पूर्व-5, कलिना-8, कांदिवली पूर्व-8, कुर्ला-5, मागठाणे-24, मालाड पश्चिम -11, मानखुर्द शिवाजीनगर-1, मुलुंड -16, वांद्रे पूर्व-7, वांद्रे पश्चिम-8, वर्सोवा-3, विक्रोळी-16, विलेपार्ले-5 अशा एकुण 245 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.