‘ग्रंथाभिसरण’ वाचनालयाची वाचकांसाठी साहित्यिक मेजवानी
अंबरनाथ- वाचनसंस्कृती वाढावी, यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील ग्रंथाभिसरण वाचनालयाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त तब्बल ९०० नव्या कोऱ्या पुस्तकांच्या संचांचे प्रदर्शन आयोजित करून साहित्यिक मेजवानी दिली आहे. पुस्तक प्रदर्शनाला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अंबरनाथमध्ये ७५ वर्षांपासून वाचन संस्कृती जोपासणारे ग्रंथाभिसरण वाचनालय दरवर्षी नवनवे उपक्रम राबवून रसिकांमध्ये वाचनसंस्कृतीची आवड निर्माण करीत आहे. यावर्षी वाचक दिनाच्या निमित्ताने ग्रंथाभिसरणने विविध साहित्याचा समावेश असलेल्या ९१४ पुस्तकांचे दोन दिवसीय वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात भरवले होते.
आमदार डॉ. किणीकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी किरण येले, शहरातील विविध क्षेत्रांतील वाचकांनी ग्रंथाभिसरणमध्ये जाऊन प्रदर्शनाला भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण मथुरे, कार्यवाह रवींद्र हरहरे यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार डॉ. किणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष प्रवीण मथुरे, प्रमोद बोऱ्हाडे, ओमकुमार देवस्कर, सुरेश शेंबेकर, दीपा गोखले, संगीता हांडे, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल आदींची उपस्थिती होती.
अध्यक्ष प्रवीण मथुरे म्हणाले, सर्व प्रकारांतील साहित्य वाचले गेले पाहिजे, पुस्तक दिन एका दिवसाकरिता मर्यादित न रहाता रसिकांनी सातत्याने वाचन केले पाहिजे. मंडळातर्फे वर्षभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाले असून ‘अ’ तालुकास्तरीय दर्जा मिळालेले ग्रंथालय आहे. ४३ हजारांहून अधिक ग्रंथसंपदा आणि १०० च्या आसपास नियतकालिके आहेत. नाममात्र शुल्कात अभ्यासिका आणि मोफत इंटरनेट सुविधा आहे.
या पुस्तकांचा समावेश
नव्याने खरेदी करून भरवलेल्या पुस्तकांमध्ये स्पर्धा परीक्षा, ऐतिहासिक, प्रवास वर्णन, पाककला, राजकीय तसेच सामाजिक चरित्रे, आत्मचरित्र, कथा, काव्य, नाटक, कादंबरी, ललित, गद्य, पद्य आदी विषयांवरील पुस्तकांचा समावेश होता.
