ठाणे : महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा स्व. शि.मं. परांजपे स्गृती पुरस्कार यावर्षी, ठाणे वैभव दैनिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांना जाहीर झाला आहे.
मिलिंद बल्लाळ यांनी संपादक म्हणून दैनिक ठाणे वैभवच्या माध्यमातून परखड भाष्य करत शहराच्या विविध उपक्रमांतून योगदान दिले आहे. तसेच साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र संपादक परिषदेने ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांना मानाचा स्व. शि.मं. परांजपे स्गृती पुरस्कार जाहीर केला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व महावस्र असे पुरस्काराचे स्वरुप असून शनिवारी, ४ मे २०२४ रोजी, माटूंगा कल्चरल सेंटर, माटूंगा, मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मिलिंद बल्लाळ यांना स्व. शि.मं. परांजपे स्गृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, प्रमुख अतिथी, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर, ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, संपादक प्रकाश पोहरे, ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र आवटी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार, सायंदैनिक संध्याकाळच्या संपादक रोहिणी खाडिलकर आदी ज्येष्ठ पत्रकारांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.