ठाणे : ठाण्याच्या वेशीवर असणारा मुलुंड चेकनाका येथील टोलनाका रद्द करा नाहीतर मतदावर बहिष्कार टाकू अशी आक्रमक भुमिका ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या ओम नगर येथील रहिवाशांनी घेतली आहे. तब्बल दहा हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरातील रहिवाशांना टोल माफी मिळावी अशी मागणी केली आहे.
हरी ओम नगर ही ठाणे शहराच्या कोपरी गावाला चिकटून वसलेली वस्ती आहे. मात्र इथे राहणारे रहिवाशी मुंबई शहरात मोडतात. त्यांचा कर भरणा देखील मुंबई महापालिकेत आहे. त्यामुळे पत्ता मुंबई असा असल्याने हरी ओम नगरपासून जवळच असलेल्या मुंबई एन्ट्री पॉइंट टोल नाक्यावर या रहिवाशांकडू टोल वसूल केला जातो.
आपल्याला टोल मुक्ती द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी करत आहेत. त्यासाठी अनेक आंदोलने, अनेक भेटी गाठी करूनदेखील ही मागणी पूर्ण झालेली नाही. हरी ओम नगर येथे ५० पेक्षा जास्त इमारती आहेत तर २६ गृहनिर्माण सोसायटी आहेत.
काही वर्षांपूर्वी या रहिवाशांच्या आंदोलनाने टोलच्या मासिक पासमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र आता पूर्ण टोल माफी द्यावी अशी मागणी या रहिवाशांनी केली आहे. तसेच कोपरी येथे पूर्व द्रुतगती महामार्गावर हरी ओम नगरमध्ये जाण्यासाठी अंडर पास आणि सिग्नल यंत्रणा देण्याची मागणी देखील रहिवाशांनी केली आहे.
महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेजा यांनी हरी ओम नगरमधील रहिवाशांच्या मागणीला देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेऊन कागदोपत्री प्रश्न निकाली काढला खरा, मात्र त्याची अंमलबजावणी अजून झाली नसल्याने रहिवाशी नाराज आहेत.