तातडीच्या कामांसाठी बॅरेज जलशुद्धीकरण केंद्र १२ तास बंद
बदलापूर: बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात येत्या शुक्रवारी नवीन पंपिंग यंत्रणा आणि विद्युत पुरवठा सुधारणा करण्याच्या कामासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार २६ एप्रिल सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तसेच शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांना दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
गेल्या काही दिवसात बदलापूर शहरातील वीज वितरण आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात तापमानात मोठी वाढ झाली, विजेची मागणी वाढली होती. परिणामी वीज वितरण व्यवस्थेवर ताण येत असल्याने चक्राकार पद्धतीने भार व्यवस्थापन करण्याची वेळ महावितरणावर आली होती. या आठवड्यात तापमान कमी असल्याने वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. गेल्या आठवड्यात वीज पुरवठ्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला होता. त्यात तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. त्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून उंच भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यातच येत्या शुक्रवारी उल्हास नदी किनारच्या खरवई येथील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रात सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत तातडीचे काम हाती घेण्यात येणार आहे. येथे नवी पाणी उपसा यंत्रणा आणि विद्युत पुरवठ्यातील सुधारणा करण्यासाठी आवश्यक कामे केली जाणार आहे. त्यासाठी १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या काळात अंबरनाथ आणि बदलापूर शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा बंद असेल.
तसेच रात्री नंतर आणि शनिवार, २७ एप्रिल रोजी होणारा पाणी पुरवठाही अनियमित तसेच कमी दाबाने राहील. त्यामुळे दोन दिवस अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या काळात नागरिकांनी पाण्याचा साठा करून उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे. एकीकडे वाढते तापमान, सुट्ट्यांमुळे घरी आलेले पाहुणे आणि त्याच वेळेस होत असलेली पाण्याची टंचाई यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.