मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

हिंगोली : उध्दव ठाकरेंकडे मुद्दे नाहीत, ते भ्रमिष्ठ झाले आहेत, आणि त्या नैराश्यातूनच ते माझ्यासहीत पंतप्रधान मोदींवर टिका करीत आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की,  बाप एक नंबरी अन् बेटा 10 नंबरी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.

हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये आज महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. आदित्य ठाकरेंच्या या दाव्यावर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. ”जनतेला माहीत आहे एकनाथ शिंदे कोण आणि माझी काय कमाई आहे. कोणी तरी म्हटले खोके नाही कंटेनर लागतात, कंटेनर कुठे गेले तेही माहीत आहे. दोन वर्षानंतर हा शोध लावला. खोके मोजल्याशिवाय झोप येत नाही ते आमच्यावर आरोप करत आहेत. आमच्याकडे कोणती प्रॉपर्टी नाही, काही नाही आम्हाला लोकांची सेवा करायची. मला जास्त बोलायला भाग पाडू नये.लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर  ठाकरेंच्या सर्व प्रकरणाची सर्व कागदपत्र आहेत. मर्यादा पाळा नाहीतर सर्व समोर आणेन, मग तोंड दाखवायला जागा राहणार नाही,” असा इशाराच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी दिला.

महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम हा शेतकऱ्याचा मुलगा असल्याची साद मुख्यमंत्र्यांनी मतदारांना घातली. महायुतीमध्ये मी आणि देवेंद्रजी काम करत असून शेतकऱ्यांसाठी योजना काढल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे. काल रात्री गारपीट झाली. सध्या निवडणूका आहेत, मात्र मी स्वतः नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्याचे शिंदेंनी म्हटले.

महाविकास आघाडी नें 4 सिंचन प्रकल्प मंजूर केले, तर आपण 122  सिंचन प्रकल्प मंजूर केले आहेत. 60 वर्षात गरिबी हटाव असा नारा होता. मात्र, गरिबी हटली नाही. पण, मोदी सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीच्या वर आणल्याचं शिंदेंनी सांगितलं. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते, म्हणूनच निवडणुकीत बाबुराव कदम विरोधकांच्या नाकावर टिचून जिंकणार, असेही शिंदेंनी म्हटले. सोयाबीन कापूस दर कमी झाले, त्यासाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना तो लाभ मिळेल.

मोदी सरकार आल्यास संविधान बदलले जाणार अशा थापा विरोधक मारत आहेत, पण मोदीजीनीं सांगितलय की जब तक सूरज चांद रहेगा, तोपर्यंत संविधान राहील, असेही शिंदेंनी म्हटले.काँग्रेसने बाबासाहेब आंबडेकरांचा पराभव केला. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, काँग्रेस हे जलळं घर आहे. म्हणूनच, महाविकास आघाडीत आम्ही उठाव केला. कारण, महाराष्ट्रतील जनतेचा विश्वासघात केला जात होता. घरात बसून सरकार चालवता येत का?, फेसबुक live वरून सरकार चालवता येत नाही, असेही शिंदेंनी म्हटले.

मराठा आरक्षण गेले अनेक वर्ष ज्यांच्या हातात होतं, त्यांनी ते दिलं नाही. याउलट मराठा मुक मोर्चा म्हणून टिंगल केली गेली. आरक्षण टिकू नये म्हणून महाविकास आघाडी कोर्टात गेली. पण, आमचं सरकार हे आरक्षण टिकवून दाखवणार. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम करणारं हे सरकार आहे. मराठा आरक्षणासाठी मी शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, ती पूर्ण केल्याचेही शिंदेंनी म्हटले.

००००००००००००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *