वाशी –  दिवसेंदिवस वाढत्‍या उष्णतेचा त्रास अनेक नागरिकांना होत असताना, पक्ष्यांनादेखील त्‍याचा फटका बसत आहे. तापमानात वाढ होत असल्‍याने पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होत असून हवेत उडताना ते गळून कोसळण्याचे प्रकार नवी मुंबईत घडत आहेत.

मागील काही दिवसांत नवी मुंबईतील तापमान ४० अंश इतके होते. त्‍यामुळे वाढत्‍या उष्मामुळे याचा अनेक नागरिकांना त्रास झाला होता, तर पक्ष्यांनादेखील या गरमीचा फटका बसत आहे. गेल्‍या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाचा फटका पक्ष्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होऊन हवेत उडताना ते गळून कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.

पक्षी उष्ण रक्ताचे असून त्यांच्या शरीराचे तापमान १०४ ते १०५ पिरॅमिड अंश इतके असते. शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पक्षी पंख पसरवून तोंडाने श्वसनक्रिया करतात. त्यामुळे ते उन्हाळ्यात बऱ्याचदा आपली चोच उघडून बसलेले असतात. त्यांचे शरीर अनेक प्रकारच्या पिसांनी आच्छादलेले असले तरी दुपारच्या वेळेत त्यांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. अशा वेळी त्यांच्या शरीराची ऊर्जा कमी होते आणि ते गळून पडतात. गेल्‍या काही दिवसांपासून नवी मुंबईत पक्षी गळून पडण्याचे प्रमाण वाढल्‍याचे पक्षीप्रेमी विशाल मोहिते यांनी सांगितले.

पशूदया महत्त्वाची

पोटातील पाण्याचा अंश कमी झाला की हवेत उडताना पक्षी खाली कोसळतात. रस्त्यात एखादा पक्षी मुर्च्छीत होऊन पडलेला असेल किंवा जखमी असेल तर अशा पक्ष्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवून शक्य झाल्यास टरबूज वा कलिंगडासारखी फळे खायला द्यावीत. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी बाल्कनी, टेरेस अथवा जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी पाणवठे तयार करावेत, असे आवाहन निसर्गप्रेमी सागर कांबळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *