पेट्रोल-गॅस महागला, १०० पैकी ८७ बेकार

माढा: १० वर्षांपुर्वी सत्तेत येताना नरेंद्र मोदींनी अनेक आश्वासनं दिली होती. २०१४ साली पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या ५० दिवसांमध्ये महागाई कमी करु, असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. मात्र,  आजची परिस्थिती बघता मोदी साहेबांनी दिलेल्या गॅरंटीतील एकही शब्द पाळलेला दिसत नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी मोदी गॅरंटीची चीरफाड केली. ते बुधवारी माढा लोकसभा मतदारसंघातील मोडनिंब येथील प्रचारसभेत बोलत होते.

यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी दिलेली किती आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत, याचा हिशेब मांडला. देशातील लोकांना महागाईच्या संकटातून मुक्त करणार, हे मोदींचं पहिलं आश्वासन होतं. आपण शेती करणारे लोक आहोत. एकेकाळी वाहनं कमी होती. पण आता वाहनांची संख्या वाढली आहे. मोटारसायकल असो किंवा चारचाकी असो त्यासाठी पेट्रोलची गरज लागते. २०१४ ला मोदी पंतप्रधान झाले तेव्हा ते म्हणाले होते की, पेट्रोलचा दर ५० टक्क्यांनी खाली आणणार. २०१४ मध्ये पेट्रोलचा प्रतिलीटर दर ७१ रुपये इतका होता. त्यामुळे हा दर ५० रुपयांपर्यंत खाली येईल, असे सामान्य जनतेला वाटले होते. पण आज त्यांची सत्ता येऊन ३६५० दिवस झालेत आणि पेट्रोलची प्रतिलीटर किंमत १०६ रुपये इतकी आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात गेली, असे शरद पवार यांनी म्हटले.

घरामध्ये स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडर लागतो. २०१४ मध्ये गॅस सिलिंडरची किंमत ४१० रुपये इतकी होती. आज हीच किंमत ११६० रुपयांवर पोहोचली आहे. मग या लोकांवर विश्वास ठेवायचा कसा, असा सवाल शरद पवार यांनी विचारला.

शरद पवारांनी मांडली देशातील बेरोजगारीची धक्कादायक आकडेवारी

शरद पवार यांनी या प्रचारसभेत देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य केले. पंतप्रधान मोदींनी २१०४ मध्ये सांगितलं होतं की, देशातील सर्व बेकारी घालवून सगळ्यांच्या हाताला काम देऊ. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) ही संस्था जगभरातील रोजगाराचा अभ्यास करते. या संस्थेने भारतातील रोजगारांचा आढावा घेतला. या अहवालात देशातील १०० लोकांपैकी ८७ जण नोकरीविना असल्याची माहिती समोर आली. मग मोदींनी कसली बेकारी घालवली? त्या आश्वासनाचं काय झालं? मोदींना दिलेला शब्द पाळता आलेला नाही. मात्र, आता तेच मोदी ठिकठिकाणी जाऊन काँग्रेसला शिव्या घालत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *