राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी बंपर गॅरंटी
अमरावती: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही देशात काँग्रेसचे सरकार निवडूण द्या , शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी योजनांची आम्ही अंमलबजावणी करू. देशात कृषी आयोगाची स्थापना करून ज्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा हा आयोग सरकारला कर्जमाफीची शिफारस करेल. त्यामुळे केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा कर्जमाफी करू अशी गॅरंटी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिली. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात तुमचं कर्ज माफ केले नाही. पण आम्ही सत्तेत आल्यावर तुमचं कर्ज लगेच माफ करु. याशिवाय, देशात एका कृषी आयोगाची स्थापना केली जाईल. जेव्हा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा हा आयोग सरकारला कर्जमाफीची शिफारस करेल. त्यामुळे केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा कर्जमाफी होईल.
या देशात संपत्तीची कमी नाही. तुम्ही देशातील अब्जाधीश उद्योगपतींकडे बघा, त्यांचं घर, गाड्या बघा. ते पाहून आपल्याला लक्षात येईल की, देशात संपत्तीची बिलकूल कमी नाही. जर अब्जाधीश उद्योगपतींचं कर्ज माफ होऊ शकतं, तर गरिबांचं कर्जही माफ झालं पाहिजे. केंद्र सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करतंय, मग शेतकऱ्यांचं कर्जही माफ झालेच पाहिजे. अन्यथा देशात कोणालाही कर्जमाफी करता कामा नये, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
राज्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये अमरावतीचा समावेश आहे. आज अमरावतीमधील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी अमरावतीमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. अमरावतीमध्ये आज राहुल गांधी यांच्यासोबत अमित शाह यांचीही सभा होत आहे. या सभेत अमित शाह राहुल गांधी यांच्या आरोपांना काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.
महिलांसाठी मोठी घोषणा, दरवर्षाला मिळणार लाख रुपये
राहुल गांधी यांनी अमरावतीमधील सभेत महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. आम्ही प्रत्येक कुटुंबाची यादी तयार करणार आहोत. प्रत्येक कुटुंबातून एका महिलेची निवड केली जाईल. या महिलेच्या बँक खात्यात काँग्रेस पक्षाचं सरकार, इंडिया आघाडीचं सरकार प्रत्येक महिन्याला 8 हजार 500 रुपये या हिशेबाने वर्षाला प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा केले जातील, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. देशातील कोट्यवधी महिलांना महालक्ष्मी योजनेचा लाभ मिळेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला.