मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने ‘सी विजिल’ हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात १६ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत २४५ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील १३५ तक्रारींचे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे मुख्य उद्दिष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार ‘सी विजिल’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी- व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून १३५ तक्रारींचे निवारण केले. शंभर मिनिटांपेक्षा थोड्या जास्त कालावधीत उर्वरित १८३ तक्रारीचा निपटारा करण्यात आला. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे.

मतदारसंघनिहाय तक्रारी

अंधेरी पूर्व- १६, अंधेरी पश्चिम- ८, अणुशक्तीनगर- ७, भांडुप पश्चिम- ५, बोरिवली- १३, चांदिवली- २६, चारकोप- १४, चेंबूर- १४, दहिसर- ८, दिंडोशी- ५, घाटकोपर पूर्व- ३, घाटकोपर पश्चिम-२, गोरेगाव-१०, जोगेश्वरी पूर्व-५, कलिना-८, कांदिवली पूर्व-८, कुर्ला-५, मागठाणे-२४, मालाड पश्चिम -११, मानखुर्द शिवाजीनगर-१, मुलुंड- १६, वांद्रे पूर्व- ७, वांद्रे पश्चिम- ८, वर्सोवा- ३, विक्रोळी- १६, विलेपार्ले- ५ अशा एकूण २४५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *