ठाणे : अखिल भारतीय कोळी समाज – दिल्ली, महाराष्ट्र शाखेची विशेष सर्वसाधारण सभा रविवार २८ एप्रिल रोजी श्री क्षेत्र एकविरा देवी संस्थान कार्ला येथे होणार आहे. या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकांनंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने संस्थेच्या वाटचालीसंदर्भात चर्चा होणार आहे. याशिवाय संघटनेच्या राज्य आणि जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांकडून मांडण्यात आलेल्या विविध समस्या, मुद्दे यावर यावेळी चर्चा होणार असल्याचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष केदार लखेपुरिया यांनी सांगितले.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केदार लखेपुरिया म्हणाले भारतीय राज्यघटनेने कोळी समाजाला दिलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्याबाबतीत राज्यशासनाने नेहमीच दुटप्पी भूमिका घेतलेली आहे. या अन्यायाच्या विरोधात संघटनेने नेहमीच लढा दिला आहे. राज्यातील अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना मध्यप्रदेश सरकारप्रमाणे नोकरीत संरक्षण द्यावे. केंद्र सरकारने पारंपरिक मासेमारीला कृषी दर्जा दिला आहे. इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी करावी. मासेमारी करणाऱ्या सर्व मच्छिमारांना किसान क्रेडिट कार्ड विनाविलंब वितरित करण्यात यावे. स्थानिक स्वराज संस्थांनी कोळी महिलांनाच मासे विक्री परवाना द्यावा , त्यांना गटई (चर्मकार) कामगाराप्रमाणे स्टॉल उपलब्ध करून द्यावेत अशा विविध मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे केलेल्या प्रयत्नाचा या बैठकीत आढावा घेला जाईल.