शहापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी बुधवारी दिवसभर शहापूर तालुक्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. कपिल पाटील यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. तर वासिंद येथील सुमारे ६०० कुटुंबांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शहरातील प्रसिद्ध उत्तर महाराष्ट्र मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कपिल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्ष (आठवले) आणि कुणबी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियोजनबद्ध प्रचार करीत नागरिकांबरोबर संवाद साधला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत केलेल्या कार्याबरोबरच कपिल पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांची माहिती दिली जात आहे. पुढील उज्जवल भविष्यासाठी पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
शहापूर तालुक्याच्या दौऱ्याला वासिंद येथून सुरूवात करण्यात आली. गावागावांमध्ये कपिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले. वासिंद, आसनगाव, चेरपोली, आटगाव, खर्डी, पळशीण, बिरवाडी आदी भागात स्थानिक राजकीय पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्तींबरोबरच ग्रामस्थांशी संवाद साधला. तर शहापूर येथे बुद्धीजीवी वर्ग असलेल्या डॉक्टर, वकील, व्यापारी आणि सिंधी, तेली, बोहरा, नाभिक समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पळशीण येथे छोटी रॅली काढून सभा झाली. या दौऱ्यात या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दौलत दरौडा, भाजपाचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अशोक इरनक, नंदकुमार मोगरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनोहर सासे, भाजपाचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, मनसेचे तालुकाप्रमुख विजय भेरे आदींची उपस्थिती होती. या दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.