मुंबई : नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार आहे. नाशिक ही शिवसेनेची पारंपारिक जागा आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा निर्णय महायुतीत समन्वयाने होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे हेमंत गोडसे सलग दोन वेळा नाशिकमधून निवडून आले आहेत.

दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महायुतीने मात्र अजूनही नाशिकच्या जागेवर उमेदवार दिलेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेऊन देखील राष्ट्रवादीने अद्याप नाशिकच्या जागेचा दावा सोडलेला नाही. त्यातच बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना नाशिक लोकसभेच्या निवडणुकीत उभं करेल, असे वक्तव्य केले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याने महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिक लोकसभेसाठी आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी देखील नाशिकच्या जागेसाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, असे म्हटले आहे. यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी, शिवसेना की भाजपला मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *