नवी दिल्ली : आदर्श आचार संहितेचे उल्लंगण केल्याप्रकरणी अखेर केंद्रीय निवडणूक आयोग इन अक्शन आल आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी या दोघांनाही आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेल्या तक्रारीवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. धर्म, जाती, समूदाय आणि भाषेच्या आधारे तिरस्कार पसरवल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. त्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसला नोटीस जारी करत २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायदा कलम 77 अन्वये दोन्ही पक्षाच्या पक्षाध्यक्षांना नोटीस जारी केली आहे. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यावरील आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपांची उत्तरे अनुक्रमे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून मागवण्यात आली आहेत. त्यात त्यांना 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आणि त्यांच्या स्टार प्रचारकांना आचारसंहितेचे पालन करण्यास सांगण्यात आलं आहे.
राजकीय पक्षांना त्यांच्या उमेदवारांच्या, विशेषतः स्टार प्रचारकांच्या वर्तनाची प्राथमिक जबाबदारी घ्यावी लागेल. उच्च पदांवर असलेल्या लोकांच्या प्रचाराच्या भाषणांचे अधिक गंभीर परिणाम होतात. स्टार प्रचारकांनी केलेल्या भाषणांची जबाबदारी संबदित पक्षाच्या अध्यक्षांची आहे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या बांसवाडा विधानावर नोटीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांसवाडा येथे दिलेल्या वक्तव्याबाबत काँग्रेस पक्षाने तक्रार केली होती. राजस्थानमधील बांसवाडा येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ‘काँग्रेस लोकांच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करून ते अधिक मुले असणाऱ्या घुसखोरांमध्ये (मुस्लिमांमध्ये))वाटप करणार आहे.”
भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणावर आक्षेप घेतला. मोदींमुळे देशात गरिबी वाढल्याचा दावा राहुल गांधी आपल्या भाषणातून करत आहेत, या दाव्यावर आक्षेप घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच राहुल गांधी आपल्या भाषणातून उत्तर आणि दक्षिण भारतात भाषा आणि भौगोलिक रचनेवरून फूट पाडत आहेत, असाही आरोप भाजपाने केला आहे.