बुलढाणा : चीनने मोठ्या प्रमाणावर निवडणूक रोखे खेरदी करून भाजपाला लाभ करून दिला आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनविरुध्द ब्रही काढायला तयार नाहीत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

बुलढाणा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार वसंत मगर यांच्या प्रचारार्थ नांदुरा येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. रावेर मतदारसंघातील नांदुरा नजीकच्या ‘एसपीएम कॉलेज’परिसरात बुधवारी ही सभा झाली. या सभेत त्यांनी, प्रधानमंत्री कार्यालय हे मानवतेचे कार्यालय होण्याऐवजी ईडी, सीबीआय व जीएसटीच्या माध्यमांतून वसुली करणारे कार्यालय बनले आहे, असा आरोपही केला.

अरुणाचल प्रदेश व लडाखमध्ये चीन आपल्या छातीवर येऊन बसला आहे. सैन्यदल हल्ला करायला तयार असताना पंतप्रधान त्यावर कुठलाही निर्णय न घेता मौन बाळगून आहेत. याचे कारण चीनने मोठ्या प्रमाणावर निवडणूक रोखे खरेदी केले आहेत असा दावाही त्यांनी केला.

केंद्र सरकार हे वसुली करणारे असून तुम्ही यांना मतदान करणार की जातीला मतदान करणार आहात, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिल्यास एनआरसी व सीएए दोन्ही कायदे हद्दपार करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. देशात हिंदू धोक्यात आल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. प्रत्यक्षात राज्यसभेच्या नोंदीनुसार, सन २०१४ ते २०२४ पर्यंत १७ लाख हिंदू कुटुंबांनी देश सोडला असून नागरिकत्वही सोडले आहे. जे २०१४ नंतर सोडून गेले ते सरकारच्या त्रासामुळे गेल्याचा दावा आंबेडकरांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *