विशेष
श्याम ठाणेदार
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात भारताने चीनला मागील वर्षीच मागे सारून अव्वल स्थान प्राप्त केले. तज्ज्ञांनी २०२३ साली भारत चीनला मागे सारून सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनेल असा अंदाज वर्तवला होता. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फ्रंट या जागतिक लोकसंख्येचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या संस्थेने त्याची पुष्टी केली होती. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फ्रंटने आता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज भारताची लोकसंख्या १४४ कोटींच्या घरात पोहचली आहे. मागील वर्षी भारताची लोकसंख्या १,४२८.६ दशलक्ष आहे तर चीनची लोकसंख्या १,४२५.७ दशलक्ष इतकी आहे म्हणजेच दोन्ही देशांच्या लोकसंख्येमध्ये २.९ दशलक्ष इतका फरक आहे. अवघ्या एका वर्षात भारताची लोकसंख्या २ कोटींनी वाढली आहे. चीनच्या लोकसंख्या वाढीचा वेग घटत आहे तर भारताचा लोकसंख्या वाढीचा वेग वाढत आहे. हाच वेग कायम राहिला तर लवकरच भारताची लोकसंख्या दीडशे कोटी होईल. आज भारताची लोकसंख्या १४४ कोटींच्या पुढे गेली आहे. देश स्वातंत्र्य झाला तेंव्हा आपली लोकसंख्या तीस कोटी होती याचाच अर्थ मागील पंच्याहत्तर वर्षात आपल्या देशातील लोकसंख्या ११४ कोटींनी वाढली. आज आपण लोकसंख्येत जगात पहिल्या क्रमांकावर पोहचलो आहोत अर्थात ही काही भूषणावह बाब नाही. देशाच्या सर्व समस्यांचे मूळ हे वाढत्या लोकसंख्येतच आहे. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे देशात अन्न, वस्त्र, निवारा, रोगराई आणि दारिद्रय असे अनेक प्रश्न उदभवू लागले आहेत. विशेष म्हणजे देशाच्या प्रगतीत वाढती लोकसंख्या ही मोठा अडसर ठरत आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून विकासालाही खीळ बसत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणेही सरकारला शक्य होत नाही. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावरून पुरेसे प्रयत्नही केले जात आहेत. पण समाजातून अजूनही त्या प्रयत्नांना म्हणावी तशी साथ मिळत नाही. कुटुंब नियोजनाची मोहीम सरकारी पातळीवर प्रभावीपणे राबवली जात आहे ही दिलासा देणारी बाब असली तरी मुलगा व्हावा या हट्टापायी तीन ते चार अपत्यांना जन्म देणारे महाभागही समाजात आहेत. या आणि अशा लोकांमुळेच ही मोहीम वेग धरत नाही. लोकसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर नव्या पिडीमध्ये लोकसंख्येविषयी योग्य दृष्टिकोन आणि जाणीव निर्माण करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी नव्या पीडिला लोकसंख्या शिक्षण दिले पाहिजे. अवघ्या २४ वर्षात जगाची लोकसंख्या पाच अब्जानी वाढली तर देशाची लोकसंख्या पंच्याहत्तर वर्षात ११० कोटींनी वाढली या वेगाने जर लोकसंख्या वाढत राहिली तर लोकसंख्येचा हा भार वसुंधरा पेलू शकणार नाही त्याचा परिणाम एकूणच मानवी जीवनावर काय होईल हे नव्या पीडिला समजावून सांगावे लागेल. देशातील लोकसंख्या जर नियंत्रणात आली नाही तर सर्वानाच अडचणींचा सामना करावा लागेल. आपण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहोत. हे स्वप्न साकार करायचे असेल तर वाढत्या लोकसंख्येला आळा घालावाच लागेल हे नवीन पीडिला पटवून द्यावे लागेल. वाढत्या लोकसंख्येमुळे होणारे दुष्परिणाम, निर्माण होणाऱ्या समस्या याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये चर्चासत्रांचे आयोजन करून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करायला हवे. लोकसंख्या शिक्षण अप्रत्यक्ष सामाजिक शिक्षण आहे त्यामुळे केवळ तरुणांनाच नव्हे तर समाजालाही या शिक्षणाची गरज आहे. लोकसंख्या शिक्षण ही काळाची गरज आहे. लोकसंख्या वाढ रोखायची असेल, देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल आणि देशाला महासत्ता बनवायचे असेल तर लोकसंख्या शिक्षणाला पर्याय नाही.