ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच आज राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमका कोण उमेदवार उभे राहणार याबाबत अद्यापही संस्पेंस कायम आहे. एकीकडे राजन विचारे यांनी प्रचाराचा धडाका लावला असतानचा दुसरीकडे महायुतीत मात्र शुकशुकाट दिसत आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी ४३ उमेदवारी अर्ज घेण्यात आले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ मे असून २७ एप्रिल, २८ एप्रिल आणि १ मे रोजी सुट्टी असल्याने या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राजन विचारे यांसह ४ उमेदवारी अर्ज घेण्यात आले असून भाजप आणि शिवसेनेकडून अद्याप एकही अर्ज घेण्यात आला नाही.
राजन विचारे हे येत्या सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे स्वतः उपस्थित राहण्याची शक्यता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात हे शक्तिप्रदर्शन करायची तयारी ठाकरे गटात केली जात आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर भागातून नेते पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना सोमवारी ठाण्यात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यानंतरच राजन विचारे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पुढे जाणार आहेत.
ठाण्यातू उमेदवारी अर्ज घेतलेल्या नेत्यांमध्ये भारतीय राजनिती विकास पार्टी १, आम आदमी पार्टी १, अपक्ष १९, भूमीपुत्र पार्टी १, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी २, बहुजन शक्ती १, संयुक्त भारत पक्ष २, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ४, हिंदुस्थान मानव पक्ष १, रिपब्लिकन बहुजन सेना २, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक ३, सरदार वल्लभभाई पटेल पार्टी २, बहुजन मुक्ती पार्टी २, भारतीय जवान किसान पार्टी २ आदी राजकीय पक्षांचा समावेश आहे. दरम्या एकुणच ठाणे जिल्ह्यात आज पहिल्या दिवशी १३४ उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात आले. तर दोघांनी लगोलग उमेदवारी अर्जही दाखल केले. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लाेकसभेच्या जागांसाठी ठाणे लाेकसभेसाठी ४३ अर्ज, तर कल्याणसाठी ३७,आणि भिवंडी
लाेकसभेच्या उमेदवारीसाठी ५४ अर्ज आदी मिळून आजच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याभरातून १३४ उमेदवारी अर्जांचे वितरण करण्या आले.
