इंडिकेटर यंत्रणेतील गोंधळामुळे

डोंबिवली:-  डोंबिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान टिटवाळा, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची चुकीची माहिती डोंबिवली रेल्वे स्थानकातील दर्शक फलकावर (इंडिकेटर) देण्यात येत होती. या चुकीमुळे प्रवाशांचा गोंधळ उडत होता. या गोंधळात एक महिला प्रवासी लोकलमध्ये घाईने चढून पुन्हा उतरताना फलाटावर पडली.

सुदैवाने लोकल कल्याणच्या दिशेने फलाटवरून संथगतीने निघाली होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ भागात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या शोभना साठे असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी या गोंधळाबद्दल मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. शोभना साठे या डोंबिवली रेल्वे स्थानकातून शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान टिटवाळा येथे लोकलने चालल्या होत्या. त्या डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ए वर उभ्या होत्या.

फलाटावरील दर्शक फलकावर टिटवाळा लोकल लावण्यात आली होती. त्यामुळे स्थानकात आलेली लोकल टिटवाळा आहे हे समजून शोभना साठे या त्या लोकलमध्ये चढल्या, त्याच वेळी लोकलमध्ये चढलेल्या प्रवाशांनी ही कल्याण लोकल आहे असा गलका केला. दर्शकावर टिटवाळा आणि स्थानकात मात्र कल्याण लोकल कशी आली, असा प्रश्न करून लोकलमध्ये चढलेले प्रवासी घाईने खाली उतरले. या गर्दीत शोभना याही उतरत असताना अचानक लोकल सुरू झाली. यावेळी उतरताना तोल गेल्याने त्या फलाटावर पडल्या. लोकल संथगतीने सुटली होती, त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. त्यांना इतर प्रवाशांनी मदत करून फलाटावर सुस्थितीत बसविले.

त्यानंतर दर्शकावर कल्याण लोकल लावली असताना त्या फलाटावर डोंंबिवली रेल्वे स्थानकातून परेलला जाणारी लोकल लावण्यात आली. या सगळ्या गोंंधळामुळे प्रवासी सकाळी हैराण होते. दर्शक यंत्रणेतील गोंंधळामुळे शुक्रवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवासी हैराण होते. यावेळी कुटुंब कबिला घेऊन प्रवासाला निघालेल्या प्रवाशांचे सर्वाधिक हाल झाले. अलीकडे फलाटावर नियमित वेळेत फलाटावर कोणती लोकल येत आहे अशी उद्घोषणा केली जात नाही, त्यामुळे प्रवासी पूर्णपणे दर्शक यंत्रणेवर अवलंबून असतात. त्यामुळे फलाटावर दर्शक यंत्रणा सुस्थितीत राहिल याकडे रेल्वेच्या तांत्रिक विभागाने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *