सोलापूर : दुष्काळात महाराष्ट्राला मदत करणाऱ्या अमुल कंपनीवर गुजराच्या तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी खटला भरला होता असा खळबळजनक आरोप शरद पवार यांनी केला आहे.

दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना आमच्या विनंतीनुसार गुजरातच्या अमूल कंपनीने जनावरांना जगविण्यासाठी चारा पाठवला होता. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. परंतु अमूलने महाराष्ट्रात चारा पाठविल्याने चिडून मोदी यांच्या गुजरात सरकारने अमूलच्या प्रमुखांवर खटला भरला होता. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या जनावरांसाठी चारा पाठविणे हा अमूल कंपनीचा गुन्हा होता का, असा सवाल करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी, आज तेच मोदी पंतप्रधान आहेत. त्यांची धोरणे शेतकरीविरोधीच आहेत, असा आरोप केला.

माढा लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ करमाळा येथे आयोजित जाहीर सभेत पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर तिखट शब्दात हल्लाबोल केला. या सभेत शिवसेना शिंदे गटाचे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे उपस्थित होते.

पवार म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्यावेळी मुक्या जनावरांना जगविण्यासाठी उसाचा वाढा हाच चारा होता. मात्र जनावरे उसाचे वाढे खात नव्हती. त्यामुळे आम्ही विनंती करून गुजरातच्या अमूल कंपनीकडून चारा मागितला. त्यांच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी गुजरातमधून चारा पाठविला होता. परंतु त्यामुळे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमूलच्या प्रमुखांवर खटला भरला असा आरोप पवार यांनी केला.

१९७२ साली सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला असता पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरत होतो. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, नामदेवराव जगताप, औदुंबर पाटील, गणपतराव देशमुख, विठ्ठलराव शिंदे यांच्या सहकार्याने आम्ही दुष्काळावर मात करू शकलो, अशी आठवणही पवार यांनी काढली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *