ठाणे : वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची तहान भागविण्यासाठी ठाणे पालिकेने पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने शहरात १५० तात्पुरत्या पाणपोई उभारण्याचे नियोजन आखले आहे. त्यापैकी तीन पाणपोई उभारल्या आहेत; मात्र इतर ठिकाणी पाणपोई उभारण्यासाठी आवश्यक असलेले रांजणच बाजारात उपलब्ध नसल्यामुळे पाणपोई उभारायची कशी, असा पेच पालिका प्रशासनापुढे उभा ठाकला आहे.
दिवसेंदिवस ठाणे शहराच्या तापमानात कमालीची वाढ होत आहे. त्यात शहरातील उष्णतेचा पार ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. तर रस्त्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. त्यामुळे याची दक्षता घेत ठाणे पालिकेने नागरिकांची तहान भागवण्यासाठी पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेच्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून १५० ठिकाणी पाणपोई सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. त्यापैकी ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू केली आहे.
पाणपोईसाठी आणखी २५ ठिकाणांची निवड पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने केली आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर पालिकेने चर्चा सुरू केली आहे. या संस्थांही पाणपोई उभारणीसाठी पुढे येत आहेत. बाजारात छोटी मडकी उपलब्ध आहेत; मात्र पाणपोईसाठी १०० ते ७५ लिटरच्या रांजणची आवश्यकता आहे, ते बाजारात उपलब्ध होत नसल्याने पालिकेपुढे पाणपोई उभारणीचा पेच निर्माण झाल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
पाणपोई आहे; पण पाणीच नाही
सध्याच्या घडीला ठाणे रेल्वे स्टेशन, नौपाडा-आईस फॅक्टरी, तीन हात नाका – सिग्नल शाळेसमोर या तीन ठिकाणी समर्थ भारत व्यासपीठामार्फत पाणपोई सुरू केली आहे. त्यात दररोज पिण्याचे शुद्ध पाणी भरण्याची व्यवस्था संस्थांमार्फत करण्यात येत आहे. अशातच ठाणे स्थानकात १०० लिटरचे रांजण ठेवून पाणपाई उभारण्यात आली आहे; मात्र त्यात पाणीच उपलब्ध नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
पालिकेमार्फत जनजागृती
तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासन, ठाणे महापालिका, काऊन्सील ऑफ ऍनर्जी एनव्हायर्नमेंट ॲण्ड वॉटर या संस्थेने एकत्रितपणे सर्वंकष उष्णता उपाययोजना आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. त्यानुसार पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी उष्माघात, लक्षणे, घ्यायची काळजी यांची माहिती देणारे फलक, डिजिटल बोर्ड लावले आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून सर्व गृहसंकुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली जात आहे.