ठाणे शहरात सोसायट्यांमध्ये मतदान जनजागृती मोहीम
ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ठाणे शहरात २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानात ठाणे शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी,यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. स्वीप पथकामार्फत गृहनिर्माण संकुलात, इमारती तसेच झोपडपट्टी परिसरात मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नुकतीच लोढा स्टर्लिंग सोसायटी,कोलशेत रोड णे येथे मतदान जनजागृती करण्यात आली.
सदर मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वा मध्ये पार पडला.
स्वाभिमानी मतदार या संकल्पने मधून मतदारांना मतदानाचे महत्व व स्वरूप स्पष्ट करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्त्रिया,पुरुष,ज्येष्ठ नागरिक व युवावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. मतदान जनजागृती राबविण्याचा उद्देश यावेळी नागरिकांना पटवून देण्यात आला देशात सर्वत्र लोकसभा उत्सव सुरू आहे. या राष्ट्रीय उत्सवात नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून देतांना त्यांच्या प्रश्नाचे व शंकाचे निरसनही करण्यात आले. यावेळी नवमतदारांना मतदान यादीत नाव कसे नोंदवावे, ऑनलाईन अर्ज कसे भरायचे यांचे प्रशिक्षण स्वीप पथकाकडून देण्यात आले. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असतो म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करा, निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते अशी जनजागृती नागरिकांमध्ये करण्यात आले.
नागरिकांना मतदान प्रक्रिया समजावून ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती यावेळी देण्यात आली. निवडणुकीच्या निमित्ताने देशाची शान, मतदान हा तुमचा हक्क आणि तुमची जबाबदारी, नैतिकतेने मतदान करा, माझे मत हा माझा हक्क आहे, तुमचे मत तुमचे भविष्य आहे, असे विविध जनजागृती करणारे फलक लावून मतदारांना माहिती देण्यात आली. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.