रत्नागिरी : अशोक गायकवाड
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार असून, यासाठी प्राप्त मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण राहुल यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली.
मतदान प्रक्रियेसाठी मतदार संघात एकूण २ हजार ७९३ बॅलेट युनिट, २ हजार ७९३ कंट्रोल युनिट व २ हजार ९०१ व्हीव्हीपॅट प्राप्त झाले आहेत. त्याची प्रथम सरमिसळ प्रक्रिया यापूर्वी झाली आहे. आजच्या प्रक्रियेदरम्यान मतदार केंद्र निहाय देण्यात येणाऱ्या मतदान यंत्राच्या क्रमांकांची आॕनलाईन पद्धतीने सरमिसळ प्रक्रिया करण्यात आली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, सिंधुदुर्ग उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) तथा ईव्हीएम व्यवस्थापन नोडल अधिकारी मारुती बोरकर यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी उपस्थित होते.