राजस्थानचे नाव घेताच राजवाडे आणि किल्ले आठतात. या शहरामध्ये तुम्हाला प्रेक्षणीय स्थळांपासून खरेदीपर्यंत अनेक ठिकाणे पाहायला मिळतील. हे शहर ऐतिहासिक किल्ल्यांसाठी जगप्रसिद्ध तर आहेच पण त्यांचा इतिहाससुद्धा जाणून घेण्यासारखा आहे. राजस्थानमधील काही किल्ले पाहण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो, तर काही किल्ल्यांवरून दिसणारी सुंदर दृश्ये भुरळ पाडतात.
राजस्थानमधील ‘तलावांचे शहर’ उदयपूरच्या उत्तरेस ८२ किलोमीटर अंतरावर भव्य कुंभलगड किल्ला आहे. मेवाड प्रदेशातील उदयपूर नंतरचा हा सर्वात महत्त्वाचा दुसरा किल्ला असून तो पर्यटकांसाठी खुला आहे.इथून सूर्यास्त पाहणे संस्मरणी असते. जुनागड किल्ला हा राजस्थानमधील बिकानेर शहरातील एक प्राचीन किल्ला त्याच्या भव्यतेसाठी आणि ऐतिहासिक आकर्षणासाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर यापूर्वी अनेकदा हल्ले झाले आहेत; परंतु शत्रूंनी तो कधीही जिंकला नाही.
मौर्यांनी सातव्या शतकात बांधलेला चित्तौडगड किल्ला राजपूतांच्या अभिमानाचे प्रतीक आहे. हा प्राचीन किल्ला देशातील सर्वात भव्य किल्ल्यांपैकी एक मानला जातो तसेच राजस्थानमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी या किल्ल्याला नक्की भेट द्या. उदयपूरचा ‘सिटी पॅलेस’ हा राजस्थानमधील सर्वात भव्य आणि सर्वात मोठा राजवाडा आहे. त्यात अनेक घुमट, अंगण, बुरुज, टेरेस, खोल्या, मंडप, कॉरिडॉर आणि बागा आहेत. सिटी पॅलेसमध्ये ११ आश्चर्यकारक राजवाडे आहेत, जे एकमेकांसारखे दिसतात; परंतु ते वेगवेगळ्या शासकांनी ते बांधले होते. असे ऐतिहासिक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे किल्ले एकदा तरी पाहायलाच हवे.
रम्य साधुपुल हिलस्टेशन
सुट्टीमध्ये निवांत क्षण अनुभवण्यासाठी हिमाचल प्रदेशच्या सुंदर आणि आकर्षक साधुपुल हिलस्टेशनला भेट द्यायलाच हवी. जगभरातून पर्यटकांच्या पसंतीस उतरलेली अनेक हिलस्टेशन्स इथे आहेत.त्यामुळे उन्हाळा असो की हिवाळा इथे पर्यटकांचा ओघ कधीच कमी होत नाही.
सोलन आणि चैल दरम्यानच्या अश्विनी नदीवर हिलस्टेशन वसलेले आहे. येथे जाण्यासाठीचा रस्ता सोलन मार्केटमधून जातो. यादरम्यान सोलनमध्ये असलेला मॉल रोडदेखील आपण पाहू शकतो. या हिलस्टेशनवर देश-विदेशातील अनेक पर्यटक येतात. दिल्लीपासून या हिलस्टेशनचे अंतर ३८८ किलोमीटर असल्यामुळे तिथून सात-आठ तासांत तिथपर्यंतचे अंतर आपण कापू शकतो. हे हिलस्टेशन कमी गर्दीचे आणि शांत आहे. सिमल्यापासून हे अंतर ३४ किलोमीटर असल्यामुळे ते पाहण्यासाठी पर्यटकांची सतत गर्दी इथे पाहायला मिळते. दिल्ली-एनसीआरमधून अनेक पर्यटक इथे भेटदेतात. या ठिकाणी नदीकाठी तंबूमध्ये राहण्याची व्यवस्था आहे त्यामुळे सकाळी उठल्याउठल्या नदीचे दर्शन होते आणि नदीच्या काठी नाश्ता करण्याचे सुख अनुभवायला मिळते.
विद्यार्थ्याचे प्रदूषणावर गजब उत्तर
परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. परीक्षेत विद्यार्थी अनेक वेळा विचारलेल्या प्रश्नांना चमत्कारिक उत्तर देत असतात. ‘सोशल मीडिया’वर एक अशाच प्रश्नाचे उत्तर व्हायरल झाले. हे उत्तर वाचून अनेक जणांना हसावे की खेद व्यक्त करावा, हे समजले नाही. या मुलाची उत्तरपत्रिका व्हायरल झाली. त्या उत्तर पत्रिकेत प्रदूषणपासून कसा बचाव करता येईल? या प्रश्नाचे गजब उत्तर त्या विद्यार्थ्याने दिले.व्हायरल झालेल्या उत्तरपत्रिकेत मुलाने प्रदूषणापासून वाचण्याचा उपाय दिला. त्याने उत्तरात म्हटले की, ‘गाड़ियों से निकलने वाला धुआं और फैक्ट्री से निकलने वाला पानी और प्रदूषित हवा कम हो जाए तभी प्रदूषण से बचा जा सकता है’ यानंतर त्याने जे लिहिले ते वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तो लिहितो की, ‘बहुत प्यार करते हैं तुमके सनम, कसम चाहे ले लो खुदा की कसम, हमें हर घड़ी आरजू है तुम्हारी, होती है कैसी सनम बेकरारी, मिलेंगे जो तुमको तो बताएंगे हम, अगर ये सब सावधानियों बरतेंगे तभी प्रदूषण से बचा जा सकता है.’
हिंदी चित्रपटातील हे गाणे त्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेमध्ये लिहिले. ही उत्तरपत्रिका कोणत्या शहरातील आहे, याची माहिती दिलेली नाही, पण ही पोस्ट हजारो जणांनी पाहिली असून त्याला लाईक केले आहे. त्याच्यावर अनेक प्रकारच्या कॉमेंट आल्या. एका यूजरने लिहिले आहे, भविष्यातील आयएएस अधिकारी. एका यूजरने लिहिले आहे, हे भविष्यातील आयएएस अधिकारी आहेत तर दुसरा म्हणतो, उत्तरपत्रिका वाचल्यानंतर शिक्षक त्या विद्यार्थ्याला शोधत असणार.
पायाला मुंग्या येतात?
कधी ना कधी हात किंवा पायांमध्ये मुंग्या येतात. हातावर झोपतो किंवा बराच वेळ पाय दुमडून बसतो, तेव्हा असे होऊ शकते. आपण याला पॅरेस्थेसिया असे म्हणू शकता. मुंग्या येण्याबरोबरच सुन्नपणा, वेदना किंवा हात आणि पायांच्या आजूबाजूला अशक्तपणा जाणवू शकतो. या समस्येचे कारण सामान्यतः दबाव, आघात किंवा मज्जातंतूंचे नुकसान असू शकते.
मधुमेहामुळे मज्जासंस्थेला हानी पोहोचते तेव्हा ही समस्या उद्भवते. यामध्ये पाय आणि हातांवर परिणाम करू शकते. मज्जातंतूंना हानी पोहोचवण्याप्रमाणेच नसांपर्यंत रक्त पुरवणार्‍या रक्तवाहिन्यांनाही यामुळे नुकसान पोहोचवू शकते. मज्जातंतूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे ते नीट काम करू शकत नाहीत. त्यामुळे मुंग्या येतात. शरीराच्या अनेक भागांतील नसा संकुचित होऊ शकतात आणि हात किंवा पायांवर परिणाम दिसू शकतो. म्हणूनच मुंग्या येणे, हात-पाय सुन्न होणे किंवा वेदना होणे या त्रासाकडे दुर्लक्ष करु नये.
किडनी नीट काम करत नसेल तर मूत्रपिंड निकामी होते. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह यांसारख्या परिस्थितीमुळे किडनी निकामी होऊ शकते. किडनी नीट काम करत नाही, म्हणजेच ती निकामी झाल्यामुळे पायात मुंग्या येणे उद्भवते. शरीरात व्हिटॅमिन बी आणि ई च्या कमतरतेमुळे नसा आणि शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो. तुम्ही कदाचित योग्य पदार्थ खात नसाल, तरीदेखील ही समस्या जाणवू शकते. अशा परिस्थितीत आवश्यक पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे हात-पायांना मुंग्या येणे सुरू होते. हे लक्षण दिसत असेल तर आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. मज्जातंतूंशी संबंधित समस्या निर्धारित औषधांचा दुष्परिणाम म्हणूनही पाहिली जाऊ शकते. क्षयरोग, उच्च रक्तदाब, एचआयव्ही आणि इतर अनेक संसर्गांमुळे कधीकधी हात आणि पाय सुन्न होतात आणि मुंग्या येतात. अल्कोहोलचे जास्त सेवन केल्यानेही नसा आणि ऊतींचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नसांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पाय आणि हातांना मुंग्या येण्यासारख्या समस्या उद्भवू शकते.
मेनोपॉजच्या काळात …
दर महिन्याला साधारण २१ दिवसांच्या अंतराने महिलांना पाळी येते. मासिक पाळीदरम्यान पोटात दुखणे आणि पायात क्रॅम्प येणे अशा शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक त्रासालादेखील महिला सामोर्‍या जात असतात. मासिक पाळी सुरू असताना चिडचिड होणे, रडावेसे वाटणे असे मूड स्विंग्ज होत असतात. त्याचप्रमाणे चाळिशीत आल्यावर मेनोपॉजमुळे महिलांमध्ये मानसिक बदलही मोठ्या प्रमाणात होत असतात. चाळिशीनंतर शरीरात संप्रेरके बदलतात. याचा जास्त परिणाम मानसिक आरोग्यावर दिसून येतो. त्याचप्रमाणे भूक न लागणे, थकवा येणे आणि अशक्तपणा जाणवणे यासारख्या शारीरिक समस्या हीदेखील मेनोपॉजची लक्षणे समजली जातात. मासिक पाळी हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर असताना महिलांना याचे दडपण येते. त्यामुळे बर्‍याचजणी नैराश्यात जातात. मात्र हा शारीरिक बदल संयमाने स्वीकारणे गरजेचे आहे. व्यायाम आणि आहाराबरोबरच स्वत:ला वेळ देणे गरजेचे आहे. स्वत:वर प्रेम करणे, स्वत:ची काळजी घेणे त्याचप्रमाणे आवडणार्‍या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
मेनोपॉजच्या काळात नैराश्यापासून दूर राहण्यासाठी योगा आणि ध्यान करणे फायदेशीर ठरते. ध्यान केल्याने मानसिक स्थिती सुधारते. मानसिक संतुलन राखण्यासाठी मेडीटेशन बरोबरच योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. घरातील सात्विक अन्न आणि ताज्या फळांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे.
मेनोपॉजमध्ये येणार्‍या डिप्रेशकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. या दिवसात चिंता, तणाव आणि शारीरिक कष्ट घेणे टाळावे. मुबलक पाणी प्यायल्या मुळे मानसिक ताण दूर होण्यास मदत मिळते. तसेच या दिवसात भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते.
गर्भधारणा होतीये सोपी
अलिकडच्या काळात सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (एआरटी) क्षेत्रात, विशेषत: इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) मध्ये उल्लेखनीय प्रगती झाली आहे. या प्रगतीमुळे केवळ यशाचा दर सुधारत नाही तर वंध्यत्वाच्या आव्हानांना तोंड देत असणार्‍या जोडप्यांना नवीन आशाही मिळत आहे.
मेडिसिन एक्सपर्ट डॉ. प्रदीप महाजन सांगतात, की प्रत्येक व्यक्तीचा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी ‘आयव्हीएफ’ प्रक्रियेचे नियोजन आखतो. यामुळे सकारात्मक परिणाम वाढतात. लवकरच गोळ्यांद्वारे उपचार न करता स्वतःच्याच शरीरातील पेशींचा वापर केला जाईल. ‘आयव्हीएफ’मध्ये नावीन्य आणणारे प्रमुख तंत्रज्ञान म्हणजे ‘प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग’. हे स्त्रीभ्रूणशास्त्रज्ञांना भ्रूण रोपण करण्यापूर्वी अनुवांशिक विकारांसाठी भ्रूण तपासण्याची परवानगी देते. ते अनुवांशिक रोगांचा धोका कमी करते आणि यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढवते. डॉ. महाजन यांच्या मते, ‘आयव्हीएफ’ प्रक्रियेदरम्यान हस्तांतरित केलेल्या भ्रूणांच्या एकूण गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी ‘पीजीटी‘ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भ्रूण अनुवांशिकदृष्ट्या निरोगी असणे हे एआरटी उपचारांमधील एक गेम-चेंजर ठरत आहे. आयव्हीएफ प्रयोगशाळांमध्ये टाइम-लॅप्स इमेजिंग सिस्टमचा वापर हेदेखील एक प्रगत तंत्रज्ञान आहे. ही प्रणाली गर्भाच्या विकासावर सतत लक्ष ठेवतात.
भ्रूण गुणवत्ता आणि व्यवहार्यतेबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतात. रिअल-टाइम मॉनिटरिंग भ्रूण निवडीबाबत अधिक चांगले निर्णय घेण्यास अनुमती देते. त्यामुळे यशस्वी गर्भधारणा आणि गर्भपाताचा धोका कमी होतो. डॉ. महाजन म्हणतात की, सेल बेस थेरपी ही आयव्हीएफ परिणाम वाढवण्यास मदत करते. हे इम्प्लांटेशन दर सुधारण्यासाठी आणि भ्रूण विकासास समर्थन देण्यासाठी मेसेन्कायमल पेशींचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करते. मेसेन्कायमल पेशींमध्ये पुनरुत्पादक क्षमता अधिक आहे. त्यांच्या गुणधर्मांचा उपयोग करून आम्ही भ्रूण रोपण आणि वाढीसाठी गर्भाशयात पोषक वातावरण निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे. सेल बेस थेरपी एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयाच्या कार्यातील अडथळे आणि पुरुष वंध्यत्वास कारणीभूत घटक यांसारख्या समस्यांचे निराकरण केल्याने प्रजनन क्षमता पुनर्संचयित करण्यासाठी आणि संपूर्ण पुनरुत्पादक आरोग्य सुधारण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध करून देतात.
बीट द हीट
काकडी खा, थंडावा मिळवा
उन्हाच्या झळा वाढत आहेत. या उष्ण काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि कपड्यांमध्ये अनेक बदल होतात. बरेचजण आहारात शरीराला थंडावा देणार्‍या घटकांचा समावेश करतात. तुम्हीही अशाच पदार्थांच्या शोधात असाल तर काकडीच्या सेवनाकडे दुर्लक्ष करु नका. शक्यतो काकडी सॅलड म्हणून खाल्ली जाते. मात्र उष्णतेवर मात करण्याव्यतिरिक्त काकडीच्या सेवनाने वजन कमी करण्यास आणि पचन सुधारण्यासही मदत होते. म्हणूनच काकडीला ‘सुपरफूड’ म्हणतात. चला जाणून घेऊ या, काकडी आहाराचा भाग बनवण्याचे काही फायदे.
* प्रचंड उष्णतेमुळे लोक उष्माघात आणि त्याच्याशी निगडित आजारांचे बळी ठरतात. अशा परिस्थितीत, काकडीचे थंड गुणधर्म केवळ संरक्षणच देत नाहीत तर आरामही देतात. तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल त्यापासून आराम मिळण्यासाठी डोक्यावर तसेच डोळ्यांवर काकडीच्या थंड केलेल्या चकत्या ठेवा.याने शरीरातील उष्णता कमी होईल.
* कॅलरी कमी आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने उन्हाळ्यात काकडीचे सेवन वजन कमी करण्यास साह्यभूत सिद्ध होते. काकडी अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्ससह शरीराचे पोषण करणार्‍या अन्य घटकांनी समृद्ध असते. शरीराला त्याचा चांगला लाभ मिळतो.
* तुमचे डोळे उष्णतेमुळे तळावले असतील किंवा सुजले असतील तर काकडीच्या फोडी १०-१५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे तणावातून आराम मिळू शकतो तसेच डोळे ताजेतवाने होतात. जळजळ कमी होते.
* काकडीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे आहारात समावेश केल्यास शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात आहारात काकडीचा समावेश केल्यास डिहायड्रेशन थांबते.
* पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरने समृद्ध असणारी काकडी रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.
* पचन सुधारण्यासाठी आहारात काकडीचा समावेश करा, कारण ही काकडी खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. पचनक्रिया सुधारते आणि मलप्रवाह नियमित होण्यास मदत होते.
* मधुमेहाचा त्रास असेल तर काकडी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आहारात काकडीचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते, जी मधुमेहामध्ये फायदेशीर मानली जाते.
* काकडीचा रस लावल्याने त्वचा तजेलदार आणि मुलायम राहते. याव्यतिरिक्त, दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने काकडीचा लेप लावल्यास त्वचेचा वर्ण सुधारू शकतो. टॅनिंग कमी होते खेरीज सुरकुत्या आणि बारीक रेषाही कमी होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *