नवी मुंबई : महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल राज्यातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस पदक आणि पोलिस शौर्य पदकासह पोलिस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्राने सन्मानित करण्यात येते.

त्याअनुषंगाने २०२३ या वर्षातील उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) जाहीर झाले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झालेल्यांमध्ये नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील सहायक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल दगडू सापते, पोलिस हवालदार संदीप मनोहर ढवळे, गिरीष रामचंद्र किंद्रे, सतीश दत्तात्रय साळुंखे, गिरीष विनायक चौधरी, कृष्णा जयराम गावित आणि दत्तात्रय किसन भगत यांचा समावेश आहे.

या सर्वांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कळंबोली येथे पोलिस मुख्यालय येथे होणाऱ्या पथसंचालनावेळी या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *