कोल्हापूर : “आमच्यावर जे खोटे आरोप करतात त्यांच्याकडे कुणी लक्ष देण्याची गरज नाही. खोटारड्यांकडे लक्ष देऊ नका. एका प्रश्नाचं उत्तर मला घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी द्यावं, आमच्याकडून फुटून गेल्यानंतर गद्दार गँगमध्ये एकजण गेला. तो एका महिलेच्या घरात घुसला आणि तिच्यावर हात उचलला. त्याचा व्हिडीओही आहे. तो निर्लज्ज माणूस अजूनही त्यांच्यासह आहे. अशा माणसाला हाकलून देण्याची हिंमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये आहे का? ” अशा गद्दारांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊ नये असे प्रतिपादन आदित्य ठाकरेंनी केले.
एकनाथ शिंदे म्हणाले होते की मी बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जातो आहे. त्यावर आदित्य ठाकरेंनी हे उत्तर दिलं आहे. ते कोल्हापूर येथे बोलत होते.
जे गद्दार गुवाहटी, सुरत आणि गोव्याला जाऊन पळतात आणि टेबलवर नाचतात अशा गद्दारांकडे मी लक्ष देत नाही. त्यांनी खरंतर माझ्या आजोबांचं नावही घेऊ नये. पण मी असल्या लोकांना महत्त्व देत नाही. जॉईन ऑर जेल पॉलिसीमुळे ते पळाले आहेत. त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचंही नाव घेऊ नये. जे काही त्यांनी सत्तेत असताना केलं त्यामुळेच त्यांना पळावं लागलं. असा टोला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.