ठाणे: एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतचा सस्पेंस रविवारीही कायम राहीलाय. अवघ्या २२ दिवसावर मतदान येऊन ठेपलेय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे यांनी निम्मा मतदार संघ पिंजून काढला असला तरी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार यावर अजुनही शिक्कामोर्तब होत नाहीय.
ठाण्याचा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचे नाव अचानक पुढे आल्यानंतर आता शिंदेसेनेतील नरेश म्हस्के गटही आक्रमक झाला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना लोकसभेसाठी ठाण्यातून उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याचे सुत्रांच म्हणमे आहे. दोनएक दिवसात त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. नरेश म्हस्के हे श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. असेही या सुत्राचे म्हणणे आहे.
भाजपाने या मतदार संघावर दावा ठोकल्याने उमेदवार घोषित व्हायला उशीर झाला आहे. ठाणे लोकसभेची ताकद पाहिल्यास मंदा म्हात्रे, गणेश नाईक आणि संजय केळकर हे भाजपचे तीन आमदार आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे दोन आमदार आहेत. तर गीता जैन या अपक्ष आमदार आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. मात्र महायुतीतील भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील एकाही नेत्याने उमेदवारी अर्ज घेतलेला नाही. ठाणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्रचाराचा धुरळा उडताना दिसत असल्याने महायुतीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा, अशी मागणीही स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे.