पर्यावरण

मिलिंद बेंडाळे

प्रत्येक नदी समाजासाठी, देशासाठी आणि पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वाची असली, तरी मोठ्या नद्यांपेक्षा लहान नद्यांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. छोट्या नद्यांना जोडूनच मोठ्या नद्या तयार होतात. लहान नद्यांमध्ये पाणी कमी असेल तर मोठ्या नद्याही कोरड्या राहतील. छोट्या नदीत घाण किंवा प्रदूषण झाल्यास त्याचा मोठ्या नदीवरही परिणाम होतो. हे चित्र आता तरी बदलायला हवे.

दर वर्षीचा उन्हाळा तोच आणि यंदाचा उन्हाळा प्रचंड जाचक आहे, हे वाक्यही तेच… मात्र युरोपीयन महासंघाच्या हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, यंदा सर्वत्र विक्रमी जागतिक तापमान नोंदवले गेले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाने विक्रमी उच्चांक गाठला आहे. युक्रेनने आधुनिक इतिहासातील दुसरे सर्वात उष्ण वर्ष अनुभवले आहे. त्यामुळेच आता जागतिक तापमानवाढ आणि हवामानबदल याचा अर्थ काय तसेच आपण त्याची किती काळजी करावी, यावर चिंतन करणे आवश्यक आहे. मानव वातावरणात कार्बन डायऑक्साइडसारखे हरितगृह वायू प्रमाणाबाहेर सोडत आहे. त्यामुळे सध्याचे जग शंभर वर्षांपूर्वीच्या तुलनेत खूप उष्ण आहे, हे सर्वांना माहीत आहेच. कोणत्याही मोठ्या विज्ञान संस्थेने २०२४ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असेल असे भाकीत केले नव्हते. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या पृथ्वीचे हवामान अतिशय गुंतागुंतीचे बनले आहे. २०२४ हे पृथ्वीवरील सर्वात उष्ण वर्ष घोषित करण्यात आले आहे. याआधीच्या २०२३ ला ही ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ अशीच ओळख मिळाली होती. यात आत्तापर्यंतचे बरेच दिवस तापमानवाढीच्या दृष्टीने विक्रमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडच्या तापमानात झालेली वाढ ही प्रामुख्याने ‘एल निनो’मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी संबंधित आहे. त्यामुळे दीर्घकालीन मानवनिर्मित तापमानवाढीची सर्वोच्च पातळी नोंदवली गेली. ‘एल निनो’ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये पूर्व प्रशांत महासागरातील उबदार पृष्ठभागाच्या पाण्यामुळे वातावरणात अधिक उष्णता पसरते. एल निनो टप्प्याच्या सुरुवातीला हवेच्या तापमानात असामान्य वाढ दिसून आली आहे. २०२४ च्या सुरुवातीस एल निनो शिखरावर पोहोचण्याची ही शक्यता वास्तववादी नव्हती. त्यामुळे हवामानात कोणत्या प्रकारचे बदल होतील याबद्दल शास्त्रज्ञांना पुरेशी माहिती नव्हती. यावर ‘यूएस सायन्स इन्स्टिट्यूट बर्कले अर्थ’चे हवामान शास्त्रज्ञ जेक हॉसफादर म्हणतात, ‘सध्याच्या उष्णतेच्या लाटेचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ती जगभरात सर्वत्र जाणवत आहे. पृथ्वीचा संपूर्ण पृष्ठभाग १९९१-२०२० कालावधीपेक्षा जास्त उष्ण होता. १८०० नंतर मानवाने मोठ्या प्रमाणावर जीवाश्म इंधन जाळण्यास सुरुवात केली. तेव्हा तापमान बरेच कमी होते. आता मात्र कॅनडा आणि इंग्लंडमधीलही उष्णतेची लाट असून पूर्व आफ्रिकेतील दीर्घकालीन दुष्काळाचा संबंधही तापमानवाढीशी जोडला जात आहे. २०१६ ते २०२३ या कालावधीमध्ये जागतिक हवामान संघटनेचे अध्यक्ष असणारे प्राध्यापक पेटेरी तालास म्हणाले, ‘हे सर्व आकडे सूचित करतात त्यापेक्षा परिस्थिती गंभीर आहे. वातावरणातील बदल दैनंदिन जीवनमान आणि दर्जावर प्रचंड परिणाम घडवून आणतात.’
हवेचे तापमान हे पृथ्वीच्या वेगाने बदलणार्‍या हवामानाचे एकमेव माप आहे. अंटार्क्टिकमधील समुद्रातील बर्फाचा विस्तार आश्चर्यकारक नीचांकावर आला आहे आणि आर्क्टिकमधील समुद्रातील बर्फाचे तापमान सरासरीपेक्षा अगदी कमी आहे. यंदा पश्चिम उत्तर अमेरिका आणि युरोपियन आल्प्समधील हिमनद्या मोठ्या प्रमाणात वितळल्या. त्यामुळे समुद्राची पातळी वाढली. उत्तर अटलांटिकसह अनेक ठिकाणी उबदार सागरी प्रवाहांमुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जास्त नोंदवले गेले आहे. जगभरातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात गेल्या चार महिन्यांमध्ये सलग विक्रमी वाढ झाली आहे. थोडक्यात, २०२४ हे वर्ष २०२३ पेक्षा जास्त गरम आहे. ब्रिटनच्या हवामान विभागाच्या मते २०२४ मध्ये प्रथमच संपूर्ण वर्षभर तापमानात १.५ अंश वाढ झाली आहे. २०१५ मध्ये पॅरिसमध्ये जागतिक हवामानबदलाचे गंभीर परिणाम टाळण्यासाठी घातक कृती मर्यादित ठेवण्याचे मान्य केले होते. ही काळजी साधारणपणे २० ते ३० वर्षांच्या दीर्घकालीन उपाययोजना सूचित करते.
प्रत्येक उष्ण वर्ष पातळी १.५ अंश सेल्सिअसच्या दीर्घकालीन वाढीच्या जवळ आणते. ‘एल निनो’सारख्या नैसर्गिक कारणांमुळे विशिष्ट वर्षांमध्ये तापमान वाढते किंवा कमी होते किंवा मानवी हस्तक्षेप दीर्घकालीन हवामान बदलास कारणीभूत ठरू शकतो. आपल्यासाठी १९९८ आणि २०१६ ही वर्षे मैलाचा दगड ठरली. त्या वेळी ‘एल निनो’च्या प्रभावामुळे तापमानात वाढ झाली होती. नंतर वाढत्या तापमानाचे मुख्य कारण असणार्‍या जीवाश्म इंधनाचा सामना करण्यासाठी ‘कोप २८’ परिषदेने एकमत व्यक्त केले. आता बदलत्या स्थितीत इलेक्ट्रिक वाहने आणि अक्षय ऊर्जेच्या बाबतीत आणखी पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी आशा आहे. तापमानवाढीचा विचार करताना एक दशांश बदलदेखील महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
आज नद्या झपाट्याने कोरड्या होत असल्याचे समोर येत आहे. नद्या तुडुंब भरण्यासाठी पाऊस पडायला अजून किमान दीड महिन्याचा अवधी आहे. बर्फाच्छादित हिमालयातून उगम पावणार्‍या गंगा-यमुना नद्यांच्या पाणलोटात दुष्काळाचे सावट वाढणे ही चिंतेची बाब आहे. गंगा खोर्‍यातील ११ राज्यांमधील सुमारे दोन लाख ८६ हजार गावांमध्ये पाण्याची उपलब्धता हळूहळू कमी होत असल्यामुळे चिंता वाढली आहे. अर्थात नद्यांमधील घटता प्रवाह ही अचानक उद्भवलेली समस्या नाही. वर्षानुवर्षे ते कमी होत आहे; परंतु नदीच्या घटत्या प्रवाहाचा सर्व दोष निसर्गावर किंवा हवामानबदलावर टाकणे योग्य ठरणार नाही. आपल्या देशात १३ मोठे, ४५ मध्यम आणि ५५ लहान जल पाणलोट क्षेत्र आहेत. पाणलोट क्षेत्र हे संपूर्ण क्षेत्र आहे जिथून पाणी नद्यांमध्ये वाहते. यामध्ये हिमनद्या, उपनद्या, नाले आदींचा समावेश होतो. हिमालयातील हिमनद्या वितळल्याने गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा या तीन नद्या उगम पावतात. या बारमाही नद्यांना ‘हिमालयन नद्या’ म्हणतात. बाकीच्या पठारी नद्या असून मुळात पावसावर अवलंबून असतात. सांख्यिकीयदृष्ट्या आपण जगातील सर्वात जलसमृद्ध देश आहोत. परंतु एकूण पाण्यापैकी सुमारे ८५ टक्के पाणी तीन महिन्यांच्या पाऊसकाळातच समुद्रात जाते आणि नद्या कोरड्या पडतात. पूर्वी नद्या पाण्याचा मोठा भाग साठवून ठेवत असत. मात्र आता नद्यांना भेडसावणार्‍या काही संकटांनी धोक्याची घंटा वाजवली आहे.
मुळात आपल्या नद्यांसमोर पाण्याची कमतरता, गाळाचा अतिरेक आणि वाढते प्रदूषण या तीन प्रकारच्या समस्या आहेत. पृथ्वीच्या तापमानात वाढ झाल्यामुळे हवामान बदलत आहे. त्यामुळे पाऊस एक तर अनियमित किंवा खूप कमी होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे नद्यांसाठी अस्तित्वाचे संकट निर्माण होत आहे. सिंचन आणि इतर कामांसाठी नद्यांचे अतिशोषण होत असून धरणे इत्यादींमुळे नद्यांच्या नैसर्गिक स्वरूपाशी होणारी छेडछाड चिंताजनक आहे. उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊ विभागातील नद्यांच्या दुर्दशेकडे लक्ष दिले, तर गंगा खोर्‍यात पाण्याचे संकट का आहे हे समजेल. अल्मोडा येथील जागेश्वर येथे गंगेचा प्रवाह एके काळी ५०० लिटर प्रति सेकंद होता, तो आता केवळ १८ लिटर इतका कमी झाला आहे. हिमनदी नसणार्‍या नद्या बर्‍याचदा झरे किंवा भूगर्भातील जलस्रोतांमधून उगम पावतात. त्यांना वर्षभर पाणी असते. मैदानी प्रदेशात वाहणार्‍या विस्तीर्ण नद्यांपैकी ८० टक्के पाणी हिमनदी नसणार्‍या नद्यांमधून आणि फक्त २० टक्के हिमनद्यांमधून येते. आजही देशात अशा जवळपास बारा हजार लहान-मोठ्या नद्या आहेत, मात्र दुर्लक्षित असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा अंदाज आहे. १९ व्या शतकापर्यंत बिहारमध्ये हिमालयातून अनेक नद्या येत होत्या. आज त्यापैकी काहीच अस्तित्वात आहेत. मधुबनी आणि सुपौलमध्ये वाहणारी तिलयुगा नदी एके काळी कोसीपेक्षा मोठी होती. आज तिच्या पाण्याचा प्रवाह कोसीच्या उपनदीपेक्षाही कमी झाला आहे. सीतामढीची लखंडेई नदी सरकारी इमारतींना चाटून गेली आहे.
नद्या संतप्त झाल्याची आणि पूर आणि दुष्काळ निर्माण करण्याची कथा ही देशातील प्रत्येक जिल्ह्याची आणि शहराची कहाणी आहे. आजकाल बिहारच्या २३ जिल्ह्यांमधून वाहणार्‍या २४ नद्या कोरड्या पडून सपाट मैदान बनल्या आहेत. यातील १६ नद्या उत्तर बिहारमध्ये तर आठ नद्या दक्षिण बिहारमध्ये आहेत. या सर्व नद्यांची एकूण लांबी २,९८६ किलोमीटर आहे. अंदाधुंद वाळू उत्खनन, जमिनीवर अतिक्रमण, नदीच्या पूरक्षेत्रात कायमस्वरूपी बांधकामे हे लहान नद्यांचे सर्वात मोठे शत्रू आहेत. दुर्दैवाने जिल्हास्तरावर अनेक लहान नद्यांची महसुली नोंद नसल्याने त्या नाले म्हणून घोषित केल्या जातात. प्रत्येक नदी समाजासाठी, देशासाठी आणि पृथ्वीसाठी अत्यंत महत्त्वाची असली, तरी मोठ्या नद्यांपेक्षा लहान नद्यांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे. छोट्या नद्यांना जोडूनच मोठ्या नद्या तयार होतात. लहान नद्यांमध्ये पाणी कमी असेल तर मोठ्या नद्याही कोरड्या राहतील. छोट्या नदीत घाण किंवा प्रदूषण झाल्यास त्याचा मोठ्या नदीवरही परिणाम होतो. हे चित्र आता तरी बदलायला हवे.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *