बीड: अवघ्या देशात लोकसभेची धुम सुरु असतानाच आज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले मिशन विधानसभा जाहिर केले. सगेसोयऱ्यांच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागा मराठा आंदोलक लढवती आणि आपण स्वतादेखील निवडणूकीस उभे राहू असे  मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

 बीडच्या सिरसमार्ग येथे अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि मराठा आंदोलन जरांगे पाटील हे एकाच मंचावर आले होते. मनोज जरांगे पाटील हे थेट रुग्णालयातून सप्ताहाला भेट देण्यासाठी आले असल्याने पंकजा मुंडे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारणा देखील केली. मात्र, यावेळी मंचावर आसन व्यवस्थेवरून मराठा आंदोलक आणि स्थानिक आयोजक यांच्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. तेव्हा पंकजा मुंडे यांनी तात्काळ माईक हातात घेतला आणि सर्वांना शांत राहण्यास सांगितले.

लोकसभेच्या निवडणूकीत आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. आम्हाला फक्त आरक्षण हवे आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला, त्या नेत्यांचा कार्यक्रम मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही.

लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जरी उमेदवार उभे केले नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार असून याची तयारी एक महिन्यापासून सुरू केल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये सरकारने मराठा समाजाच्या एकीची धास्ती घेतली असून पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जात आहेत. तर नरेंद्र मोदींना देखील स्वतःचा प्रचार सोडून आता इतर नेत्यांचा देखील प्रचार करावा लागत आहे, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सहकारी असलेले गंगाधर काळकुटे यांनी बीडमधून लोकसभेचा अर्ज भरला होता. यावर बोलताना जरांगे म्हणाले की, त्यांच्यामागे कोणी आहे का? कारण ते मला भेटून बीडमध्ये गेले आणि अचानक अर्ज कसा भरला याचा शोध घ्यावा लागेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय आहे असेही जरांगे पाटील म्हणाले. मोदी साहेबांना इकडे लक्ष देण्याची गरज नव्हती. पण मराठा समाज एकटवल्याची भीती असल्याने मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात प्रचारासाठी आणावे लागत आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *