मागील काही वर्षात दुष्काळाने पिचलेल्या महाराष्ट्राला भारतीय हवामान खात्याने सुखद धक्का दिला आहे. भारतीय हवामान खात्याने यावर्षी पडणाऱ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज बळीराजासाठी सुखावणारा आहे. कारण यावर्षी सरासरीच्या १०० ते १०३ टक्के इतका पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी देशाच्या उत्तर आणि ईशान्य भागात तसेच महाराष्ट्रासह दक्षिण भागातही सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हा अंदाज बळीराजासाठी जितका सुखावणारा आहे तितकाच तो उद्योग जगतासाठीही सुखावणारा आहे. कारण कोरोनामुळे उद्योग जगताची घसरलेली गाडी अजूनही सावरलेली नाही. त्यात मागील दोन वर्ष राज्यावर दुष्काळाचे सावट होते. या वर्षीही राज्यात भयंकर दुष्काळ असल्याने त्याचा उद्योग जगतावर देखील मोठा परिणाम झाला आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवरच अवलंबून आहे. शेती हाच भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आजही देशाची ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे तिच्या स्थैर्यासाठी आणि विकासासाठी शेतीचे विशेष महत्व आहे. मागील काही वर्षात देशात दुष्काळ पडला होता. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता. कोरोनामुळे देशातील अनेक उद्योग ठप्प पडले होते त्यामुळे देशाचा जिडीपी ही घसरला होता अशावेळी शेती क्षेत्राने देशाला वाचवले होते. कोरोना गेल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा असतानाच या वर्षी राज्यात आणि देशात पुन्हा भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या वर्षी राज्यात अत्यल्प पाऊस पडल्याने राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. दुष्काळामुळे राज्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील पाणी साठा संपत आला आहे. नद्या कोरड्या पडल्या आहेत. धरणे आटली आहे. बोअरवेलला पाणी लागत नाही. नागरिकांना वापरण्यासाठी सोडा पण पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही. एका एका हांद्यासासाठी नागरिकांना कैक किलोमिटरची पायपीट करावी लागत आहे. शहरात आठ आठ दिवसांनी टँकर येत आहे. राज्यात दुष्काळ पडल्याने शेतीलाही पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. अशावेळी सर्वांच्या नजरा हवामान खात्याच्या अंदाजाकडे लागल्या होत्या. सुदैवाने हवामान खात्याचा सुखद अंदाज आल्याने राज्यातील दुष्काळग्रस्त नागरिकांना सुखद धक्का बसला आहे. यावर्षी सरासरी इतका पाऊस होणार असल्याने भरघोस पीक येऊन रान आबादानी होणार आहे. शिवाय राज्यातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. जर हवामान खात्याने वर्तवलेला अंदाजानुसार पाऊस झाला तर उद्योग जगतावर ही त्याचा सकारात्मक परिणाम होईल. एकूणच हवामान खात्याने वर्तवलेला मान्सूनचा हा सुखद अंदाज सर्वांनाच सुखावणारा आहे.