राजीव चंदने
मुरबाड : येत्या 10मे रोजी कल्याण मध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे भिवंडी लोकसभेतील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील आणि कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानात या दोन्ही उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली होती. त्याचप्रमाणे आता येत्या १० मे रोजी कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जाहीर सभा घेणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभेचे उमेदवार
कपिल पाटील यांनी दिली. तर नरेंद्र मोदी यांची सभा होण्याआधीचे भिवंडी आणि कल्याण लोकसभेचे चित्र अतिशय पोषक आहे. पण नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इथल्या झंजावाताचे महायुतीच्या वादळामध्ये रूपांतर होईल अशा प्रकारचा विश्वासही भिंवडी लोकसभेच्या कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. मोदींचे विचार स्वयंस्फूर्तीने ऐकण्यासाठी जनता येत असते, अशाप्रकारे जनता हे विचार ऐकते आणि त्यांनाही मोदींच्या विचारांची प्रेरणा मिळते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित रहा असे आव्हान भिवंडी लोक सभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले आहे
