मॉन्सूनच्या सामान्य पावसाच्या अंदाजानुसार खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्याची सरकारची अपेक्षा आहे. अर्थ मंत्रालयाने मासिक आर्थिक अहवालात म्हटले आहे की परकीय चलनाची मजबूत आवक आणि अनुकूल व्यापार तूट यामुळे रुपया अधिक चांगल्या श्रेणीमध्ये राहण्याची अपेक्षा आहे.आर्थिक व्यवहार विभागाच्या मासिक अहवालात म्हटले आहे की आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे, कारण मॉन्सूनच्या काळात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल. पावसाचे चांगले वितरण झाल्यास उत्पादन अधिक होऊ शकते. वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की २०२३-२४ या आर्थिक वर्षात किरकोळ महागाईमध्ये लक्षणीय घट झाली आहे आणि ती कोविड-१९ महामारीनंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दर फेब्रुवारीमध्ये ८.७ टक्के होता. मार्चमध्ये तो ८.५ टक्कयांवर आला. रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेच्या स्थितीबाबत आपल्या अहवालात सावध भूमिका घेतली आहे. किरकोळ महागाई चार टक्कयांच्या लक्ष्याजवळ येत आहे; परंतु खराब हवामान, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भू-राजकीय अनिश्चितता यामुळे चलनवाढीचा धोका कायम आहे. मासिक अहवालात म्हटले आहे की जागतिक आव्हाने असूनही भारताची आर्थिक कामगिरी मजबूत राहिली आहे. जागतिक विकासात भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचा दावा केला जात आहे. अहवालात म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय संस्थांचे मूल्यांकन आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चालू आर्थिक वर्षातील वाढीच्या अंदाजानुसार प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
वित्त मंत्रालयाच्या अहवालानुसार उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांच्या विस्तारामुळे एकूणच आर्थिक क्रियाकलाप उत्साही राहतील. त्यात म्हटले आहे की भू-राजकीय तणाव हा चिंतेचा विषय आहे. विविध क्षेत्रांमध्ये उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनांचा व्यापक वापर करून व्यापार तूट कमी होईल, अशी आशा वित्त मंत्रालयाला आहे.