सध्या निवडणूक प्रचार अगदी रंगात आलेला आहे. या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत, सुषमा अंधारे प्रभूती मंडळी शिंदे गटाच्या नेत्यांचा आणि उमेदवारांचा उल्लेख करताना आवर्जून “गद्दार” असं करतात. त्यांच्या दृष्टीने त्यांनी तसा उल्लेख करणे हे अपरिहार्यच आहे. कारण एकनाथ शिंदे गटाने त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याशी म्हणजेच शिवसेनेशी गद्दारी केली आहे. शिवसेनेचे महाआघाडीसोबतचे सरकार सत्तेत काम करत असताना या मंडळींनी धोकेबाजी करत ते पक्षातून बाहेर पडले. परिणामी आमचे सरकार पडले. इतकेच काय तर आमचा पक्षही फुटला. फक्त फुटण्यावरच थांबला नाही, तर पक्षाची मालकी, पक्षाचे निवडणूक चिन्ह, सारेच काही आम्हाला गमावावे लागले. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून या सर्वच मंडळींनी शिंदे गटाचा उल्लेख गद्दार असा करणे ही त्यांची अपरिहार्यताच मानावी लागेल.
गद्दार हा मूळ उर्दू शब्द आहे. उर्दूमध्ये गद्दारी म्हणजे धोकेबाजी बेईमानी असा अर्थ होतो. हा अर्थ लक्षात घेतला तर एकनाथ शिंदे गटाने ठाकरेंच्या शिवसेनेशी धोकेबाजी केली आहे, बेईमानी केली आहे. त्यांना अंधारात ठेवून रातोरात सुरतमार्गे गोहत्ती गाठून तिथे वेगळा गट बनवत मग महाराष्ट्रात येऊन भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार बनवले आहे. ही त्यांच्या दृष्टीने गद्दारीच आहे. त्यामुळे त्यांचा सात्विक संताप हा रास्तच म्हणावा लागेल.
मात्र ठाकरे शिवसेनेच्या या सर्वच नेते मंडळींनी एक बाब लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आम्ही समोरच्याकडे एक बोट दाखवतो, तेव्हा आमच्या हाताची तीन बोटे आमच्याकडे असतात. त्यामुळे एखाद्या घटनेसाठी समोरच्याला जबाबदार ठरवताना त्यात आम्ही कुठे चुकलो याचे कठोर आत्मपरीक्षण करणेही गरजेचे असते. मात्र सर्वसामान्यपणे कोणीच तसे आत्मपरीक्षण करत नाही, आणि कायम दुसऱ्यालाच दोषी ठरवत आम्हीच कसे बरोबर हा दावा प्रत्येक जण करत असतो.
ठाकरे शिवसेनेतील नाशिक लोकसभा क्षेत्राच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यावेळी शिवसेना नेते राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी इथेही आमच्यासमोर कोणीतरी गद्दारच यावा आणि त्याला आम्ही जमिनीत गाडून टाकत राजकारणातून संपवावे अशी मनोमन इच्छा असल्याचे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील सर्वच गद्दारांना असेच गाडून टाकायचे आहे असेही ते बोलले. ठाकरे शिवसेनेचे सर्वच नेते शिंदे गटाच्या सर्व मंडळींना गद्दार म्हणून हिणवतात. मात्र “हमाम मे सब नंगे होते है” ही बाब ते सोयीस्कररित्या विसरतात. या महाराष्ट्रात सत्तेसाठी गद्दारी फक्त एकनाथ शिंदे गटानेच केली आहे काय याचे उत्तर शोधायला गेल्यास आज एकनाथ शिंदे गटावर गद्दारी केल्याचा आरोप करीत त्यांना शिव्याशाप देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाने या महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेल्या जनमताच्या कौलाशीच गद्दारी केली आहे ही बाब ते पद्धतशीरपणे दुर्लक्षित करतात.
याबाबत थोडे विस्ताराने भाष्य करायचे असल्यास आपल्याला २०१९ मध्ये जावे लागेल २०१९ मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोघांनीही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका युती करून लढवल्या होत्या. यावेळी प्रत्येक सभेत एकत्रितपणे दोन्ही पक्ष मतदारांना सामोरे जात होते. परिणामी दोन्ही पक्षांना मिळून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले होते.
विधानसभा निवडणुकीच्या वेळेसही दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढवल्या. त्याआधी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बसून जागावाटपही केले होते. त्यानुसार दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. नंतर बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाल्याच्याही बातम्या येऊ लागल्या. विशेषतः जिथे भाजपचा उमेदवार आहे तिथे शिवसेना उमेदवाराने बंडखोरी करण्याचे प्रकार बऱ्यापैकी घडले. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना सर्व नेते महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असेच सांगत होते. या प्रचारात शिवसेनेचे कोणतेही नेते विशेषतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुठेही काहीही बोलले नाहीत. फडणवीस पुढचे मुख्यमंत्री होणार या घोषणेला त्यांनी कुठेही विरोध केला नाही. त्याचबरोबर अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द अमित शहा यांनी दिला आहे असे कुठेही त्यांनी जाहीर केले नाही. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीला जनतेने जो कौल दिला तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार बनवण्यासाठीच, असा निष्कर्ष निश्चितच काढता येतो.
मात्र निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर उद्धवपंतांनी पवित्रा बदलला. जागोजागी झालेल्या बंडखोरीमुळे भाजपच्या काही जागा कमी झाल्या होत्या. भाजप १०६ जागांवर विजयी झाला होता. तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या होत्या. दोन्हींची बेरीज केली असता ही युती सत्तेत येणार हे चित्र स्पष्ट दिसत होते. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन पक्षांना विरोधी पक्ष म्हणून काम करण्यासाठी मतदारांनी कौल दिलेला आहे हे देखील अधोरेखित होत होते.
मात्र इथेच उद्धव यांनी आणि त्यांच्या तत्कालीन शिवसेनेने जनमताने दिलेल्या कौलाशी गद्दारी केली. आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द अमित शहा यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे दोघेच असताना दिला होता असा दावा उद्धव ठाकरेंनी केला, आणि आम्हाला पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यावे अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांना फोन करून केली असती तरी ते रास्त मानता आले असते. मात्र त्यांनी तसे न करता पत्र परिषदेतूनच आपली मागणी जाहीर केली. अशी मागणी भाजप मान्य करणार नाही हे त्यांनीच ठरवून टाकले, आणि लगेचच ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यांच्याशीच सरकार स्थापनेसाठी बोलणे सुरू केली. त्यातूनच एक अनैसर्गिक अशी महाविकास आघाडी गठीत झाली, आणि या आघाडीचे सरकार महाराष्ट्रावर लादले गेले.
वस्तूतः मतदारांनी कौल दिला होता तो भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला. प्रचारादरम्यान मतदारांना पुढले मुख्यमंत्री भाजपचे होणार हे देखील सांगितले जात होते. म्हणजेच भाजपच्या नेतृत्वात शिवसेनेच्या सहकार्याने सरकार बनणार हे स्पष्ट होते, आणि याच प्रस्तावाला मतदारांनी उचलून धरले होते. म्हणूनच १०६ अधिक ६३ शिवाय काही अपक्ष असे जवळजवळ १७५ सदस्यांचे स्पष्ट बहुमत असणारे सरकार सत्तारूढ करण्यासाठी जनतेचा कौल होता.
मात्र हा जनतेचा कौल नाकारणे आणि ज्यांना विरोधात बसण्याचा आदेश जनतेने दिला आहे त्यांना सोबत घेऊन सरकार बनवणे, आणि सरकार चालवणे हा जनमताचा अनादर नाही काय? म्हणजेच ही जनमताशी केलेली गद्दारी ठरत नाही काय?
होय…
हे सर्व मुद्दे लक्षात घेतले तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेना फोडून बाहेर निघत सरकार बनवले म्हणून त्यांना गद्दार म्हणताना आपणही जनमताशी गद्दारी केली आहे याचे भान उद्धवपंत ठाकरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ठेवायला हवे. तुम्ही आज आम्ही धुतल्या तांदळासारखे आहोत असा दावा करत जनतेसमोर फिरालही, मात्र जनता चतुर आहे. ती काही बोलणार नाही पण खरे गद्दार कोण हे जनताच ठरवेल.