मुंबई : मुंबई, ठाण्यात आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वाजतगाजत उमेदवारांनी अर्ज दाखल करीत असताना त्याच जागावर महायुतीतमात्र सन्नाटा आहे. नक्की जागा कोण लढविणार याबाबतच अजून संस्पेस कायम आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यात मात्र चलबिचल वाढली आहे.
ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजन विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर, दुसरीकडे दक्षिण मध्य मुंबईतून महायुतीकडून राहुल शेवाळे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना उबाठा गट आणि शिंदेच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
दक्षिण मुंबईतून शिवसेनेकडून भाजपाच्या राहुल नार्वेकर यांच्याएवेजी आता आमदार यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे भाजपनेही अद्याप दावा सोडलेला नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा प्रचारदेखील या लोकसभा मतदासंघांत सुरू आहे. त्यामुळे या जागेवरील वाद कायम आहे.
उत्तर पश्चिम मुंबईमध्ये उध्दव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर महायुतीकडून रविंद्र वायकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र मनसेने त्यांच्या नावावर आक्षेप घेतला असून, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी मनसेची आहे. याचमुळे अद्याप या ठिकाणचा पेच कायम आहे.
ठाणे
ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे, इथे राजन विचारे दोनदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळेच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांकडून प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मिनाक्षी शिंदे आणि नरेश मस्के यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. तर दुसरीकडे भाजपकडून संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांचे नाव चर्चेमध्ये आहे. अजूनही वाटाघाटी पूर्ण न झाल्याने या मतदारसंघात उमेदवार जाहीर झालेल्या नाही.
नाशिक हा सर्वाधिक चर्चेत राहीलेला मतदार संघ आहे. येथे एकनाथ शिंदेंचे शिलेदार हेमंत गोडसे हे विजयाची हॅट्ट्रीक करण्यासाठी सज्ज आहेत पण नाशिकची जागा ही राष्ट्रवादीला देण्यासाठी भाजपकडून आग्रह धरण्यात आला. भाजपने साताऱ्याची जागा राष्ट्रवादीकडून घेऊन त्या बदल्यात नाशिकची जागा त्यांना देण्याची आश्वासन दिले होते. त्यामुळेच राष्ट्रवादी कडून छगन भुजबळ यांचे नाव इथे जवळपास निश्चित झाले होते. पण शिवसेनेकडून होणारा विरोध पाहता त्यांनी स्वतःहून माघार घेतली आहे. असे असूनही ही जागा शिवसेनेकडे जाणार की राष्ट्रवादीकडे जाणार आहे अजून निश्चित झालेले नाही. शिवसेनेकडून हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे. एकीकडे महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नसताना दुसरीकडे शांतीगिरी महाराज यांनी अर्ज भरत नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. पालघर या लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावित हे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवली होती. मात्र मूळचे गावित हे भाजपचे असून ही जागा देखील भाजपचीच मानली जाते. त्यामुळे राजेंद्र गावित यांचे नाव निश्चित मानले जात असले तरी ते शिवसेनेकडून लढणार की भाजपकडून लढणार हे अजून निश्चित झालेले नाही.
नाशिक आणि ठाणे या जागेवरचा फैसला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पालघरच्या जागेचा तिढा देखील सुटणार नाही अशी शक्यता आहे. कारण जर एखादी जागा शिवसेनेला द्यावीच लागली तर ती पालघरची जागा भाजपला देऊन ठाणे आणि नाशिक स्वतःकडे ठेवण्याचा विचार सध्या सुरू आहे.
दरम्यान, विषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना विचारले असता त्यांनी ज्या जागांचा तिढा आहे तो लवकरच सुटेल अशी प्रतिक्रिया दिली.
