मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पुढील तीन टप्प्यांतील मतदानासाठी महाविकास आघाडी आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडी यांची एक संयुक्त समन्वय बैठक उद्या मंगळवारी ३० एप्रिल रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दुपारी ३ वाजता दादर येथील शिवसेना भवनात होणार आहे.
या बैठकीला महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचे मुख्य संयोजक ज्येष्ठ पँथर – रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. या बैठकीत पुढील तीन टप्प्यांतील मतदानासाठी प्रचार आणि जनसंपर्कासाठी संयुक्तरीत्या मोहिमेची आखणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
भाजपचे मित्र पक्ष नसलेले आणि या निवडणुकीत बौद्ध समाजाचे निर्णायक मतदान भाजपच्या पथ्यावर पडणे मुळीच मान्य नसलेले रिपब्लीकन गट, आंबेडकरवादी, बहुजनवादी पक्ष  संघटना भाजपच्या पराभवासाठी राज्यभरात जागोजागी एकवटल्या आहेत, असे सांगून गायकवाड म्हणाले की, मुंबई, ठाणे जिल्हा, नवी मुंबई, नाशिक येथील हजारो आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या एकजुटीतून आम्ही ‘ प्रागतिक रिपब्लिकन आघाडी ‘ स्थापन केली आहे. या आघाडीने महाविकास आघाडीला सक्रिय पाठिंबा दिला आहे.मंगळवारच्या बैठकीसाठी अनेक रिपब्लिकन, आंबेडकरवादी संघटनांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे.
विदर्भापाठोपाठ मराठवाड्यात लातूर येथेही आंबेडकरवादी विचारवंत वकिल, साहित्यिक, कलावंत, पत्रकार  भाजपविरोधात एकवटले आहेत. त्यांनीही बौद्ध समाजाला आवाहन केल्याने आमच्या भूमिकेला नैतिक आणि वैचारिक बळ मिळाले आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.
गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील प्रागतिक रिपब्लिकन आघाडीमध्ये माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर, माजी पोलीस अधीक्षक डॉ.संजय अपरांती, ज्येष्ठ पत्रकार सुनील खोब्रागडे, माजी आयआरएस अरविंद सोनटक्के, पँथर नेते सयाजी वाघमारे, सुरेश केदारे, संशोधक केशव वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, ऍड. किरण चन्ने, ऍड.राजय  गायकवाड, डॉ.अशोक बहिरव, सतीश डोंगरे आदी नामवतांचा समावेश आहे.काही बहुजनवादी, आंबेडकरवादी पक्ष हे केवळ पक्षीय अस्तित्वासाठी निवडणूक लढवत आहेत. ते जिंकणे तर दूरच, भाजपला कदापिही रोखू शकत नाहीत. त्यांचे स्वबळावर जिंकण्याचे दावे म्हणजे शुद्ध भाबडेपणा आणि बौद्ध समाजासाठी राजकीय आत्मघात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *