कळवा : मुंब्रा बायपास रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे ठाणे-नाशिक महामार्ग ठप्प झाला होता. त्याचवेळी सकाळी साडेआठच्या सुमारास ठाणे-बेलापूर रस्त्यावरील विटावा रेल्वे सबवेखालून जाताना एक कंटेनर पुलाच्या सुरक्षा कठड्याला अडकला, त्यामुळे ठाणे-बेलापूर वाहिनी बंद झाली. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा ठाण्यातील साकेत व कोर्ट नाक्यापर्यंत लागल्या होत्या. ही वाहतूक सकाळी साडेअकरानंतर सुरळीत झाली; मात्र यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागल.
मुंब्रा बायपासवर मंगळवारी (ता. ३०)ला सकाळी मालवाहू ट्रक पलटी झाल्याने रस्त्यावरील एक बाजू बंद झाली होती. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने त्याचा परिणाम नाशिक-ठाणे महामार्गावर झाला. या मार्गावरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांनी साकेतमार्गे कळवा पुलावरून वाहतूक सुरू केली. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. त्यातील एक कंटेनर सकाळी साडेआठला ठाणे-बेलापूर रस्त्यावर असलेल्या विटावा सबवेखालील संरक्षक कठड्याजवळ अडकला. हा कंटेनर क्रेन व जेसीबीने काढण्यास सुमारे २० ते २५ मिनिटे लागली, त्यामुळे साकेत व कोर्ट नाक्यापर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कळवा विभाग पोलिसांनी शर्थीने प्रयत्न केले.
