डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सर्वाधिक वर्दळीचे रस्ते सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आल्याने जागोजागी वाहन कोंडी आणि या कोंडीने नागरिक हैराण आहेत. या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी नागरिक पर्यायी रस्त्यांचा अवलंब करतात. हे रस्तेही खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना मागे फिरल्यानंतर पुन्हा कोंडीचा सामना करावा लागतो. डोंबिवली पूर्व भागातील टिळक रस्ता, सावरकर रस्ता, आगरकर रस्ता सेवा वाहिन्या टाकणाऱ्या ठेकेदाराने खोदून ठेवले आहेत. अचानक एकावेळी सर्वाधिक वर्दळीचे रस्ते ठेकेदाराने खोदून ठेवल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. फोर जी केबल वाहिन्या, महानगर गॅसच्या भूमिगत वाहिन्या आणि इतर कंपन्यांच्या सेवा वाहिन्या टाकण्याची कामे यावेळी केली जात आहेत.
टिळक रस्त्यावर खोदकाम करून रस्त्याच्या कडेला मातीचे ढीग आहेत. या अरूंद रस्त्यावर दररोज सकाळ, संध्याकाळी वाहनांची कोंडी होते. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडे येणारी सर्व वाहने याच रस्त्याने येतात. या रस्त्यावरील कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी नागरिक पर्यायी रस्ते म्हणून आगरकर रस्ता, सावरकर रस्ता भागातून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी सावरकर रस्त्यावरील भूषण सोसायटी आणि कर्वे यांच्या बंगल्या समोर रस्ता मध्यभागी खोदून ठेवण्यात आला आहे. याठिकाणी एक बँक आहे. सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे कार्यालय या रस्त्यावर आहे. त्यामुळे हा रस्ता खोदल्याने या रस्त्यावर दररोज कोंडी होते. फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांंचे यामध्ये सर्वाधिक हाल होत आहेत.
आगरकर रस्त्यावर आगरकर सभागृहा समोरील रस्ता, याच रस्त्यावरील गॅस वितरक अतुल देसाई यांच्या कार्यालया समोरील रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. नवखा वाहन चालक रस्त्यावर आला की तो या कोंडीत अडकतो. रस्ते खोदाई करताना परिसरातील सोसायटी चालकांंना कोणतीही पूर्वसूचना ठेकेदाराने न दिल्याने काही वाहन चालकांची वाहने सोसायटीच्या आवारात अडकून पडल्याच्या तक्रारी आहेत. पालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही रस्त्यांच्या चरी आणि काँँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी नागरिकांंकडून केली जात आहे.
कोट
डोंबिवली पूर्वेत ज्या रस्त्यांवर खोदकाम केले आहे. त्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे. त्यामुळे या रस्त्यांवर सेवावाहिन्या टाकून घेण्याची कामे करून घेतली जात आहेत. रस्ते खोदकाम, चऱ्या भरण्याची कामे २० मे पूर्वी पूर्ण केली जाणार आहेत.
मंगेश सांगळे (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, डोंबिवली)