कांगा क्रिकेट लीग
मुंबई : दुर्वेश पाटीलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कुर्ला स्पोर्ट्स क्लबने यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनचा (वायएमसीए) सात विकेट्सनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या डॉ.एच .डी कांगा क्रिकेट स्पर्धेच्या क गटातील बाद फेरीच्या लढतीत विजयी आगेकूच केली. दुर्वेशने ३२ धावांत ५ बळी मिळवत वायएमसीए संघाला ७७ धावांवर गुंडाळले. त्यानंतर मोहित बिष्टने ४६ आणि विवेक सामोगरने नाबाद २५ धावा करत ८० धावांसह पुढच्या फेरीतले स्थान निश्चित केले.k
दुर्वेश, विशाल राठोड आणि नफिस खानच्या अचुक टप्प्याच्या गोलंदाजीसमोर वायएमसीएचे फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. सिद्धेश टिळेकरने २५ आणि अभिजित खंदारेने १३ धावा केल्यामुळे वायएमसीएला ७७ धावपर्यंत मजल मारता आली. विशालने २३ धावांत ३ आणि नफिसने २० धावांत २ बळी मिळवत दुर्वेशला चांगली साथ दिली. विजयाच्या माफक धावांचे आव्हान कुर्ला स्पोर्ट्स क्लबने १०.४ षटकात तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. या डावातील तिन्ही बळी रजनीश शर्माने मिळवले .
संक्षिप्त धावफलक : यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन : १८.२ षटकात सर्वबाद ७७ (सिद्धेश टिळेकर २५, अभिजित खंदारे १३, दुर्वेश पाटील ९-३-३२-५ , विशाल राठोड ५.२-२३-३,नफिस खान ४-२०-२) पराभूत विरुद्ध कुर्ला स्पोर्ट्स क्लब : १०.४ षटकात ३ बाद ८० ( मोहित बिष्ट ४६, विवेक सामोगर नाबाद २५, रजनीश शर्मा ५-१-१५-३).