दिन विशेष

भागा वरखडे

एकीकडे लोकसभा निवडणुकींची धामधूम तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना साजरा होत असणारा यंदाचा महाराष्ट्र दिन खास म्हणायला हवा. अलिकडे राज्याने बर्‍याच अप्रिय घटना पाहिल्या. जातीपातीचे वाढते राजकारण चर्चेत आहेच. मात्र या सगळ्या नकारात्मकतेवर मात करत राज्याची अस्मिता जपण्याचा संकल्प या दिनाच्या निमित्ताने करायला हवा. तरच भविष्य उज्ज्वल असेल.

स्व पासून विश्वापर्यंतच्या विचारकक्षेमध्ये आपल्या राज्याचे स्थानमहात्म्य वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आपली पाळेमुळे रुजलेला हा प्रांत आपला असतो. कालांतराने कार्यक्षेत्र वेगळे झाले तरी आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्प्याची जडणघडण झालेला हा भाग आपल्या वैयक्तिक, सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक जाणीवांमध्ये एक वेगळे स्थान राखून असतो, हे नाकारण्यात अर्थ नाही. त्या अर्थाने बघायचे तर महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि इथेच वाढलेल्या सर्व जनांनी आनंदपूर्वक एकत्र साजरा करावा असा दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन. केवळ महाराष्ट्रीयन नव्हे तर या भूमीने अनेकांचे जीवित जपले आहे. देशाच्या विकासात अग्रणी असणारे हे राज्य अनेक परप्रांतिकांचे सहर्ष स्वागत करणारे आहे. त्यामुळे अनेक कंठांमधून निघणारा ‘जय जय महाराष्ट्र माझा…’चा जयघोष प्रत्येकाला सुखावून जातो.
आज महाराष्ट्र निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहे. लवकरच विधानसभा निवडणुकांची नांदी ऐकू येईल. सहाजिकच हा काळ देश आणि राज्याच्या दृष्टीनेही संक्रमणाचा आहे. मात्र या सगळ्यात आपली संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्याचे मोठे काम करावे लागणार आहे. अलिकडे महाराष्ट्राचा बिहार होत असल्याची शंका उपस्थित करुन देणार्‍या अनेक घटना आपण पाहिल्या. भर दिवसा गोळीबाराच्या घटनांनी, खून वा महिलांवरील वाढत्या अत्याचारांनी ग्रस्त लोकांचा आक्रोश ऐकू येत आहे. राजकारणाचा एक वेगळा आणि आत्तापर्यंत अपरिचित असलेला बाज या राज्यातील नागरिक अनुभवत आहेत. मात्र या नकारात्मकतेवर मात करण्याची ताकदही या मातीनेच आपल्याला दिली आहे. त्यामुळेच चांगल्याचे स्वागत आणि वाईटाविरुद्ध बडगा उभारुन पुढे जाण्याचे धोरण राबवतच आपण यंदाचा महाराष्ट्र दिन साजरा करायला हवा.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेचे महत्त्व कायम राहील, हे पाहिले जाण्याची आवश्यकताही लक्षात घ्यायला हवी. त्यासाठी मराठी भाषेचा कमी झालेला वापर वाढीस लागला पाहिजे. राज्यात दुकानांचे फलक मराठीतून असावेत, मराठी भाषेच्या वापरावर अधिक भर दिला जावा, यासाठी चळवळी उभारल्या जातात, ही समाधानाची बाब म्हणायला हवी. जन्माने मराठी असणे हेच खरे तर अभिमानाने ‘मी मराठी’ म्हणण्यास पुरेसे आहे. पण या मराठीपणावर कोणी आक्रमण करत असेल तर अशा चळवळी गरजेच्या वाटतात. सण, उत्सव, संस्कृती, परंपरा यातून हे मराठीपण व्यक्त होते. कोणतीही व्यक्ती कितीही मोठी झाली तरी तिला आपल्या मातीचा अभिमान असायलाच हवा.
राजकारण असो वा समाजकारण, एखादी व्यक्ती कितीही मोठी झाली तरी आपल्या मातृभूमीत काय काम केले याची दखल घेतली जाते. पंतप्रधान असो वा राष्ट्रपती त्यांच्या स्वत:च्या प्रदेशात केलेल्या कामाची नेहमीच चर्चा होते. थोडक्यात, आपल्या मातृभूमीशी, जन्मभूमीशी असणारे संबंध जिव्हाळ्याचे असतात आणि ते तसे असायलाच हवेत. या मातीचा, मातीतील प्रत्येक गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटायला हवा. मराठी संस्कृतीला तर केवढी मोठी परंपरा आहे! ‘अतिथी देवो भव’ असे आपली संस्कृती सांगते. अर्थात दारी आलेल्या पाहुण्याला देव मानून त्याचे स्वागत करावे. महाराष्ट्रातील कोणत्याही प्रांतात गेलात तरी या स्वागतशीलतेचा प्रत्यय येतो. प्रत्येकाची स्वागत करण्याची पध्दत वेगळी.. म्हणजे विदर्भात गेलात तर वर्‍हाडी भाषेत पाहुणचाराचा वर्षाव होईल. पश्चिम महाराष्ट्रातील स्वागताची पध्दत आणखी वेगळी. पण यातील स्वागतशीलता लक्षात घेतली पाहिजे. याउलट, मध्य प्रदेश किंवा केरळ अशा वेगळ्या राज्यांमध्ये गेल्यानंतर वेगळाच अनुभव येतो.
महाराष्ट्रात प्रत्येकाचे स्वागत एक माणूस म्हणून केले जाते. याउलट बाहेरच्या राज्यात तुम्ही कोणत्या प्रांतातून आलात, असा प्रश्न विचारला जातो. याचाच अर्थ त्यांच्याकडे आलेला पाहुणा कोणत्या प्रांतातून आला, यावर त्याचे स्वागत कशा पध्दतीने करायचे हे ठरते. केवळ एक माणूस म्हणून इतर राज्यात पाहुण्याचे स्वागत केले जायला हवे. मराठी माणसाने मात्र आपल्याकडे येणारा कोणीही असला तरी स्वागत करताना त्याची संस्कृतीही समजून घेण्याचा प्रयत्न केला. इतकेच काय, त्यांची भाषाही मराठी माणसाने शिकून घेतली. समोरची व्यक्ती परराज्यातील असेल तर मराठी माणूस त्याच्याशी हिंदीतून संवाद साधतो. असे सौजन्य दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसत नाही. मात्र, आपण अन्य राज्यांमधील लोकांचे शब्द, त्यांच्या संस्कृतीचा मोठेपणा मान्य केला, हेही लक्षात घ्यायला हवे. राज्याच्या सीमेवरील भागांमधील चित्र पाहिले तर तेथील मराठी माणूस सीमेपलीकडील राज्याचीच भाषा बोलताना दिसतो. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावांमध्ये मराठी माणूस काम, व्यवसायासाठी कानडी भाषा बोलतो. हीच परिस्थिती विदर्भात आहे. तेथील लोक प्रामुख्याने हिंदीच बोलताना आढळतात. पोट भरण्यासाठी, दैनंदिन कामाची गरज म्हणून त्यांनी ही भाषा स्वीकारली आहे. पण ही स्वीकारशीलता अन्य राज्यांमधील लोकांमध्ये कमी प्रमाणात आढळते. ही मंडळी पोट भरण्यासाठी आपल्या राज्यात येतात त्यावेळी गरज म्हणून मराठी भाषा आत्मसात करून बोलणे अपेक्षित आहे. भाषा बोलता येत नसेल तर तिचा अपमान करू नये, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरत नाही.
अर्थविश्वाबरोबर मनोरंजनविश्वात आपल्या राज्याचा दबदबा वाढत आहे. अनेक कलाकार परस्परांशी आवर्जून मराठीतून बोलतात. अनेक मराठी कलाकार मराठीबरोबर हिंदीतही बरेच काम करताना दिसतात. काही मोठे कलाकार कोणत्याही वाहिनीवर, कोणत्याही कार्यक्रमाला गेले तरी आवर्जून मराठी बोलतात. त्याचप्रमाणे हिंदी चॅनेल्सवर नृत्यासाठी आवर्जून मराठी गाणे निवडतात. या व्यवसायात येणार्‍या नव्या पिढीबाबत मात्र असे ठामपणे सांगता येत नाही. ही मंडळी बरेचदा दिखाऊपणा करण्यासाठी इंग्रजीतून किंवा नाहीच जमले तर हिंदीतून बोलतात. मराठी चित्रसृष्टीत वावरताना त्याची काहीच आवश्यकता नसते. या बाबतीत मालिका किंवा चित्रपटांमध्ये काय परिस्थिती आहेे हेही पहायला हवे. मालिका असो वा चित्रपट, समाजातील स्थितीचेच प्रतिबिंब उमटत असल्याने तिथे मिश्र संस्कृतीचे दर्शन घडते. काही इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यामध्ये इतके रुळले आहेत की त्यांना प्रतिशब्द वापरला तरी तो चटकन लक्षात येत नाही. ‘टेन्शन’, ‘ट्रान्स्परन्सी’ असे अनेक शब्द अगदी सर्रास वापरले जातात. याऐवजी तणाव, पारदर्शीपणा असे शब्द वापरले तर ते पुस्तकी वाटतात. हे केवळ आपल्याच प्रांतात होते असे नाही तर इतरही राज्यांमध्येही असे काही इंग्रजी शब्द रुळले आहेत. अर्थात बदलत्या काळानुरुप, जीवनशैलीनुसार असे होणे स्वाभाविक मानले तरी मराठीला दुय्यम लेखून चालणार नाही. आपल्याकडे बर्‍याच वर्षांपासून मराठीच्या वाट्याला उपेक्षा आली आहे. मराठी संस्कृतीला अनेक वर्षांची परंपरा असल्याने ती टिकून राहील, हा आशावाद योग्यच आहे. पण ती टिकवण्यासाठी प्रत्येकाने सजग रहायला हवे.
या पार्श्वभूमीवर अलिकडच्या काळात चित्र बदलत असल्याचे दिसत आहे. मराठीकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले आहे. युवा पिढी डोळ्यासमोर ठेवून मराठी गाणी लिहीली जात आहेत आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. सलील कुलकर्णी, संदीप खरे, अजय-अतुल यांनी याबाबतीत केलेले काम मोलाचे आहे. त्यांच्या संगीत-कवितांनी युवा पिढील आपलेसे केले आहे. तरुण मुले मराठी गाणी गुणगुणू लागणे, हे देखील सुचिन्ह म्हणावे लागेल. मराठी रंगभूमी समृद्ध होतीच, ती आणखी जोमाने पुढे येत आहे. नवतेचे स्वागत करणारा इथला रसिकवर्ग सकस कलाकृतींना डोक्यावर घेत आहे. महाराष्ट्रातील वाढती उद्यमशीलता आणि कल्पकताही आता देश आणि जगापुढे येत आहे. संशोधनापासून संकल्पनेपर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात त्या त्या क्षेत्रातील कार्यरत व्यक्तींचा सहभाग समाधानकारक ठरत आहे. अर्थात, एवढ्याने भागणारे नाही. मराठी भाषेची अस्मिता टिकवायची तर प्रत्येकाने आपल्या पातळीवर प्रयत्न करायला हवेत. इंग्रजी येणे ही आजच्या काळाची गरज असली तरी मराठीचा अभिमान असायलाच हवा. आपल्या मुलांवरही तसे संस्कार पालकांनी करायला हवेत. असे झाले तर मराठी भाषेचे आणि पर्यायाने मराठीजनांचे महत्त्व कायम राहील, यात शंका नाही. आपली अस्मिताही तेवढीच जिवंत ठेवली तर यशाचा वारु रोखणे कोणालाही शक्य होणार नाही. फक्त त्यासाठी जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडत राज्याने एकतेचा मंत्र जपावा लागेल.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *