पनवेल : पनवेल महापालिकेच्या मुख्यालयाची भव्यदिव्य इमारत उभारली जात आहे. नुकताच मुख्यालयाच्या कामाचा आढावा आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी घेतला. या वेळी महापालिकेच्या मुख्यालयाचे काम वेगाने करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

मुख्यालय इमारतीमधील दोन स्वागतकक्ष व पार्किंग येथील दोन पिलर्समधील अंतर जास्त असल्यामुळे या ठिकाणी ग्रीड स्लॅब, वाईडेड स्लॅब, पोस्ट स्टे्रस पद्धतीचे स्लॅब टाकण्यात येत आहेत. इमारतीचे काम ४० टक्के पूर्ण झाले असून एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होण्याचा विश्‍वास प्रकल्प अभियंता यांनी दिला. याबाबत कंत्राटदाराला सूचना करण्यात आल्या असून त्याबाबत दैनंदिन नियोजन करण्यात आले आहे. या कामाच्या दैनंदिन तांत्रिक बाबींकरिता स्वतंत्र अभियंत्याची नियुक्ती पनवेल महापालिकेने केली आहे. इमारतीचे काम प्रगतिपथावर असल्याचे पाहून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात स्थापत्य कलेचे अद्वितीय उदाहरण म्हणून गणली जाणारी महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत पनवेलकरांची अस्मिता ठरणार आहे. त्यामुळे वेगाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, कार्यकारी अभियंता संजय काटकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चार लाख चौरस फुटात बांधकाम

तळघरासहीत सहा मजली बांधण्यात येणाऱ्या या इमारतीच्या सध्या तिसऱ्या माळ्याचे काम सुरू आहे. चार लाख आठ हजार ६३ चौरस फूट क्षेत्रामध्ये ही इमारत बांधली जात आहे. इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिल यांच्या प्लॅटिनम रेटिंगची ही ग्रीन इमारत होणार आहे. त्या दृष्टीने या इमारतीची संकल्पना वास्तूविशारद हितेन सेठी यांच्याकडून करून घेण्यात आली आहे. त्याच पद्धतीने या इमारतीच्या बांधकामाचे साहित्य वापरले जात आहे. इमारतीमध्ये २२४ आसन क्षमता असलेले मुख्य सभागृह, एक बहुद्देशीय सभागृह, दोन समिती सभागृहे, टेरेसवर आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे.

कोट

पालिका मुख्यालयाच्या कामाचा दर्जा सर्वोत्तम राहावा, याकरिता वेळोवेळी व्हीजेटीआय या नामांकित सरकारी महाविद्यालयाच्या विशेष तज्ज्ञांकडून त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षण केले जात आहे. या कामाचे स्टील व सिमेंट हे आंतरराष्ट्रीयस्तरावर नावाजलेल्या व दर्जेदार पुरवठा करणाऱ्या कंपनीकडूनच घेणे बंधनकारक केले आहे.

– संजय काटकर, प्रकल्प अभियंता, पनवेल महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *