किरीट सोमय्यांनी केला ‘लव्ह जिहाद’चा आरोप

मुंबई : प्रेयसीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर असल्याच्या संशयावरून एका टॅक्सी ड्रायव्हरने घरकाम करणाऱ्या तरुणीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत नाल्यात फेकून दिले. याप्रकरणी आरोपी नजिम खान याला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय पूनम क्षीरसागर हिचा मृतदेह २५ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे सापडला. ती मानखुर्द येथे राहत होती. तसंच, नागपाड्यात ती घरकामासाठी जात होती. १८ एप्रिल रोजी सकाळी ती तिच्या कामासाठी घरातून निघाली, परंतु सायंकाळी घरी परतलीच नाही. नेहमीच्या वेळेत घरी न परतल्याने तिच्या कुटुंबाने तिच्या मालकांना फोन करून याबाबत विचारले असता ती सायंकाळीच निघून गेली असल्याचं कळलं. तिचा काहीच शोध लागत नसल्याने पालकांनी मानखूर्द पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.

२५ एप्रिल रोजी उरणच्या एका निर्जन ठिकाणी एक कुजलेला मृतदेह पोलिसांना सापडला. पोत्यात बांधून ठेवलेला हा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आणि ओळख पटवण्यासाठी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, मानखुर्द पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंद झाल्याने मानखुर्द पोलिसांनी पूनमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून मृतदेह ओळखण्यास सांगितले. मृतदेहाच्या हातातील ब्रेसलेट आणि तिच्या कपड्यांवरून तिची ओळख पटवण्यात आली. शवविच्छेदनात पूनमचा गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तपासादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांना आढळून आले की नागपाडा येथील निजाम खान हा पूनमला मानखुर्द येथून दररोज नागपाडा येथे सोडत असे.

निजामने पोलिसांना सांगितले की, “१८ एप्रिल रोजी तिची शिफ्ट संपल्यानंतर मी आणि पूनम खडवली येथे गेलो. तिथे ती बुडाली. त्यामुळे मी तिला सरकारी रुग्णालयात नेले. परंतु तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पूनमचा मृत्यू झाल्यामुळे मी घाबरलो. त्यामुळे तिचा मृतदेह उरणच्या खाडीत फेकून दिला.”

याप्रकरणी उरण पोलिसांनी निजाम खानला ताब्यात घेतलं असून त्याची अधिक चौकशी केली. चौकशीअंती त्यानेच तिचा खून केला असल्याचं कबूल केलं. पूनमचे दुसऱ्याबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने तिची हत्या केली.

किरीट सोमय्यांकडून लव्ह जिहादचा दावा

सोमवारी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पूनमच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि ‘लव्ह जिहाद’मुळे तिची हत्या झाल्याचा दावा केला. “मी पूनम क्षीरसागर हिच्या मानखुर्द येथील निवासस्थानी तिच्या कुटुंबासोबत आहे. तिला निजाम खानने पळवून नेले होते. त्याने तिला फसवले आणि नंतर तिची हत्या केली. ही आणखी एक लव्ह जिहादची घटना आहे आणि तिचे कुटुंब न्याय मागत आहे”, असं किरीट सोमय्या म्हणाले. या घटनेबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याशी बोललो असून जो कोणी जबाबदार असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

वारिस पठाण यांनी दावा फेटाळला

दरम्यान, AIMIM नेते वारिस पठाण यांनी किरीट सोमय्या यांचा दावा फेटाळून लावला आहे. “गुन्हा कोणी केला असेल त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. पण भाजपा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे”, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *