शरद पवरांचा मोदींवर पलटवार

शिरुर: पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी माझे कौतुक करताना त्यांना माझे बोट धरून राजकारणात आलो होतो असे अभिमानाने सांगितले होते  मात्र, आता ते बोलत आहेत की, महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, ती अस्वस्थ आहे. हा अस्वस्थ आत्मा गेली 45 वर्षे महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करत आहे. तो सरकार अडचणीत आणतो. होय!  माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं आहे. पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे. शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही, अशा शब्दात शरद पवारांनी आज मोदींवर पलटवार केला.

 सध्या संबंध देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना प्रपंच करणे अवघड झाले आहे. त्यासाठी मी 100 वेळा अस्वस्थ होईन, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. सामान्य माणसांची भूमिका मांडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केले पाहिजे, हे यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत. या संस्कारांशी मी कधीही तडजोड करणार नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले. ते मंगळवारी शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

मोदी म्हणतात की, मी तडफड करतो. होय, मी लोकांचं दु:ख पाहून तडफडतो. मला कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मी लाचार होणार नाही. महाराष्ट्र लाचार होणार नाही. भाजपने आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, अनेक वर्षे काम करण्याची संधी दिलेल्या लोकांना फोडले. हे फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो, इथे अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. पंतप्रधान काल म्हणाले मी ईडीचा एक टक्काही वापर करत नाही. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. पण तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय, असे शरद पवार यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *