Month: April 2024

सतीश तुपे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त  सत्कार

मुंबई पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक  कार्यकर्ते मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील इलेक्ट्रिक सेक्शनचे चार्जमन, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मॅनेजिंग कमिटी मेंबर व धडाडीचे कार्यकर्ते  सतीश शंकर तुपे हे मुंबई पोर्ट ट्रस्टमधून ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल २०२४  पासून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त वर्कशॉपमधील कामगारांनी  माझगाव येथील वर्कशॉपमध्ये सतीश तुपे  व  पत्नी श्रद्धा तुपे यांचा  २६ एप्रिल २०२४ रोजी शाल, श्रीफळ,  पुष्पगुच्छ  व भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार केला. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, विविध खात्यातील कामगार, नातेवाईक, माझगाव डॉक, फ्लोटीला वर्कशॉप यांच्यावतीने सतीश तुपे यांचा सत्कार करण्यात आला. सतीश तुपे हे प्रामाणिक, आदर्श व निष्ठावंत सामाजिक कार्यकर्ते आहेत.  युनियनच्या प्रत्येक आंदोलनात ते नेहमी अग्रभागी होते. त्यांनी कामगारांचे दैनंदिन प्रश्न, हॉस्पिटलला मदत, पेन्शन असे अनेक  प्रश्न पाठपुरावा करून यशस्वीपणे सोडविले. त्यांना उदंड आयुष्य आणि चांगले आरोग्य लाभो,  तसेच त्यांच्याकडून यापुढेही कामगारांची चांगली सेवा घडो. अशी शुभेच्छापर भाषणे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे  पदाधिकारी सुधाकर अपराज, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विजय रणदिवे, विकास नलावडे, निसार युनूस, मारुती विश्वासराव,  विजय पंदीरकर,  आप्पा सूर्यवंशी, पोर्ट ट्रस्टचे  विद्युत अभियंता राजेश वाधवाणी,  सहाय्यक विद्युत अभियंता इकबाल बामणे, दत्तात्रेय सुगवेकर, संध्या सुगवेकर, स्मिता चंदने आदी मान्यवरांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनियनचे कमिटी मेंबर  श्रीकृष्ण पडेलकर यांनी केले. कार्यक्रमास मुलगी मधुरा तुपे व मुलगा साईराज तुपे उपस्थित होते. सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी विष्णू पोळ, योगेश चौले, विजय बामगुडे,  सुनील गायकर,  नितीन रायकर,  नारायण पालव,  मेलविन डिसोझा,  संजय आरगडे,  रिझवान शेख,  श्रीकृष्ण पास्ते,  राजेश वाडेकर,  जावेद सोलकर,  टी. एलांगोवन, वाघमारे आदी कामगार कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

९ वर्षांपासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात, यावर्षी ४० टक्केच आंबा पिक हातात – संजय केळकर

 शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱा हा आंबा महोत्सव १ ते १२ मे पर्यंत गावदेवी मैदानात ! अनिल ठाणेकर ठाणे : अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे झालेली फळगळ  व थ्रीप्स रोग, तुडताडा किटकांच्या प्रादूरर्भावामुळे तसेच हवामान बदलामुळे यावर्षी ४० टक्केच आंबा पिक हाती लागले आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे, अशी कोकणातील आंबा शेतकऱ्यांची परवड आमदार संजय केळकर यांनी मांडली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित  शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱा हा आंबा महोत्सव १ ते १२ मे पर्यंत गावदेवी मैदानात होणार असल्याची माहिती आ. संजय केळकर यांनी दिली आहे. कोकणातील एकूण १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची पागवड केली जाते. २०२१ साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न ३  लाख २० हजार मेट्रिक टन होते. यातील २६० कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि १०० कोटी रुपयांचा आंबा निर्यात करण्यात आला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन २०२२ मध्ये २ लाख ५६ हजार मेट्रिक टन आणि २०२३ रोजी १ लाख २८ हजार मेट्रिक टन झाले असून १२६ कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि ५४ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. या वर्षी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे फळगळ झाली व थ्रीप्स रोग, तुडताडा किटकांच्या प्रादूरर्भावामुळे चाळीस टक्केच आंबा पिक हाती लागले आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षापासून कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे, या साऱ्या परिस्थितीचा ठाणेकर नक्कीच विचार करून आंबा महोत्सवास दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी आंबा महोत्सवात करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे. दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव म्हणजे व्यापारी पेठ नसुन एक चळवळ आहे. गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाला लाखो ग्राहक भेट देत असतात. याठिकाणी प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध आहे. तरी, कोकणातील अस्सल हापुस आब्यांसाठी खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले आहे. यावेळी कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, ठामपा माजी उपमहापौर सुभाष काळे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. चौकट यंदा असह्य उकाड्यात हैराण ठाणेकरांना आंबा महोत्सवाचा गोडवा अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार सेवाभावी संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानात १ मे पासून आंबा महोत्सवास सुरुवात होत आहे. १ ते १२ मे पर्यंत आंबा महोत्सव, सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरु असणार आहे. यावेळी महोत्सवाचे १७ वे वर्ष आहे. शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात, कोकणातील अस्सल हापूस आंबा, पायरी, रत्ना केसर आंब्या बरोबरच आंबा- फणस पोळी, सरबते, सुके-ओले काजू, मालवणी मसाले, पापड, लोणचे अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनाचे कोकणातील शेतकऱ्यांचे ४५ स्टॉल व ठाण्यातील महिला बचत गटाचे ५ स्टाॅल असे ५० स्टॉल या महोत्सवात असणार आहेत. चौकट महोत्सवात मिळणार अस्सल हापुस ! सध्या बाजारात हापुस आंब्याच्या नावाखाली सर्रास कर्नाटकचा आंबा विकला जातो. कोकणातील अस्सल हापुस कापल्यावर केशरी रंगाचा असतो. तर कर्नाटकी आंबा पिवळा असतो. ठाण्यातील आंबा महोत्सवात ५०० ते ९०० प्रती डझन या दराने आंबा उपलब्ध असुन तरी चोखंदळ ग्राहकांनी महोत्सवातच अस्सल हापुस खरेदी करावी. असे आवाहन कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केले आहे.

ठाण्यात एसबीआयच्या नौपाडा शाखेकडून ग्राहकांसाठी मतदार जागृती मोहीम

ठाणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यातील मतदान 20 मे 2024 रोजी होणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याअंतर्गत वाढवण्यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत असलेल्या १४८ ठाणे विधानसभा मतदार संघ निवडणूक कार्यालयाच्या वतीने नौपाडा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांसाठी जनजागृती मोहिम राबविण्यात आली. लोकशाही मजबूत करणे आणि प्रत्येक नागरिकाने भारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा मुलभूत अधिकार बजावणे हे अत्यंत आवश्यक आहे, या विषयी स्टेट बँक ऑफ इंडियामधील कर्मचारी व ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले.  १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियामधील अधिकारी, कर्मचारी व ग्राहकांकडून मी मतदान करणार आणि इतरांनाही सांगणार, अशी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. बँकेतील सर्व कर्मचारी मतदान जनजागृतीमध्ये सहभागी होणार असून मतदान करा, मतदानासाठी घराबाहेर पडा असे संदेश मोबाईलद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात येतील, असे आश्वासन बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी दिले.

महिला बचतगट मतदार करत आहेत मतदान जनजागृती

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानात ठाणे जिल्ह्यातील महिलांचा टक्का वाढविण्यासाठी वाढवण्यासाठी २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदार संघात स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप टीमने भांजेवाडी येथील उतेकर चाळीत महिला बचत गटांच्या महिलांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले. १४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम घेण्यात आला. मतदान प्रक्रियेची माहिती देणाऱ्या रिक्षातून भांजेवाडी, भास्कर कॉलनी परिसरात जनजागृती करण्यात आली. महिला वर्गात मतदानाबाबत जागरुकता निर्माण होणे आवश्यक असून निवडणूक प्रक्रियेमध्ये महिला मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी तसेच मतदार जागरुकता व मतदान टक्का वाढवण्यासाठी उतेकर चाळ, भांजेवाडी, ठाणे येथील महिला बचतगट यांच्या माध्यमातून महिलांमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला बचत गटांच्या अध्यक्षा, सचिव, सदस्य आणि इतर महिलाही उपस्थित होत्या. महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो. या संपर्काचा वापर करुन महिला बचत गटांनी महिलांमध्ये मतदानाविषयी जनजागृती कशी करावी व मतदानातील महिलांचा सहभागाचा टक्का कसा वाढवावा या विषयी स्वीप पथकाकडून मार्गदर्शन करण्यात आले. मतदानामध्ये सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. एकही महिला मतदानापासून वंचित राहू नये. शहरातील महिलांना मतदानासाठी सहभागी करून घेण्यामध्ये महिला बचत गटांनी सहभाग द्यावा. बचत गटाच्या माध्यमातून बचत गटाच्या सदस्य, आजूबाजूला राहणाऱ्या महिला,कुटुंबातील सदस्य, नव मतदार आणि नागरिक यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आणि दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मतदान जनजागृती कार्यक्रमाचा समारोप सामूहिक मतदानाची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला. मतदान म्हणजे मतदान असतं भांजेवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सुलभ मतदानासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. यावेळी ७४ वर्षे वयाच्या श्रीमती बर्वे म्हणाल्या की, मतदान म्हणजे मतदान असतं तुमच्या-आमच्यासाठी ते संविधानाचं वरदान असतं!, मी २० मे रोजी मतदान करणार आणि इतरांना ही मतदान करायला सांगणार.

आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या!

शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती ठाणे : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या व शालेय  विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निःपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे.यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन स्वीप पथकाने उपस्थितांना केले. मतदान जनजगृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये पार पडला. शाळकरी मुलांना मतदानाचे महत्त्व कळावे व प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी आई-बाबास पत्र हा उपक्रम राबविला. त्या पत्रात विद्यार्थ्यांनी पालकांना भावनिक साद घालत असा संदेश लिहिला की, आम्ही मत देऊ शकत नाही, पण तुम्ही द्या! मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. तसेच विद्यार्थीवर्गाने विविध घोषणा देऊन मतदानाचा जागर केला. मतदान करा… मतदान करा… लोकशाहीचा विजय करा या संकल्पनेमधून मी मतदान करणारच आपण ही करा’ असा प्रेरक संदेश फलकावर लिहून शिक्षक व कर्मचारीवर्गांनी स्वाक्षरी मोहीम राबवली.

दुय्यम निबंधक कार्यालयात मतदान जनजागृती

ठाणे, : ठाण्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात लग्नाच्या नोंदणीसाठी आलेल्या नववधू-वरांसह वऱ्हाडींमध्ये येत्या 20 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघ स्वीपच्या टीमने केले. सध्या लग्न सोहळ्यांची धामधूम सुरू आहे. त्यामध्ये जमणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा लाभ मतदानविषयक जनजागृतीसाठी उठवला जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या २० मे रोजी मतदान होत आहे. या वेळी मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघ स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दुय्यम निबंधक हे विशेष विवाह नोंदणीचे काम करतात. दुय्यम निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी करण्यासाठी नववधू-वर व वऱ्हाडी यांची नेहमीच वर्दळ असते. त्यात आज रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. याचेच औचित्य साधून स्वीप टीमने दुय्यम निबंधक कार्यालय येथे सहा.निवडणूक अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व दुय्यम निबंधक श्रीमती. राऊत यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती कार्यक्रम घेतला होता. विवाह नोंदणी करण्यासाठी ठाणे शहरातील नववधू-वर व वऱ्हाडी दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. त्या सर्वाना मतदान टक्केवारी कशी वाढेल या विषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. तसेच मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे यांची जाणीव त्यांना करून देण्यात आली. प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता मतदानाचा अधिकार बजावावा. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी व सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांना, नातेवाईकांना व राहत असलेल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे. सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आलेल्या सर्व वऱ्हाडींकडून ‘मी मतदान करणारच’ असे अभिवचन घेण्यात आले. यावेळी नवीन घरात सून म्हणून प्रवेश करताना भारतीय नागरीक आणि ठाणे शहरातील सजग मतदार म्हणून मतदान करेल. नागरिकांनीही मतदानात सहभाग घ्यावा, असे नववधू समिक्षा मंचेकरने सांगितलं आहे. संसाराच्या कर्तव्यासोबत मी देशाप्रती असणारे कर्तव्यही पार पाडणार आहे आणि मतदान करणार आहे, असे नवीनच लग्न झालेले हर्षद सावंत म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदान केंद्रनिहाय सुसज्जता पूर्ण-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३२ रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १९२ अलिबाग विधानसभा क्षेत्रातील मतदान प्रक्रियेसाठी प्राप्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची मतदान केंद्रनिहाय सुसज्जता (कमिशनिंग) पूर्ण करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली. जे एस एम महाविद्यालय अलिबाग येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कमिशनिंग प्रसंगी निवडणूक निरीक्षक ( सर्वसाधारण ) संजीव कुमार झा, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्रीमती जोयस लालरेम्मवी, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मतदान यंत्रांची कार्यक्षमता तपासून सुसज्य करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हिव्हिपॅट ची कमिशनिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मतदान यंत्र घटक योग्य कार्य करत आहेत याची खात्री करण्यासाठी चाचणी केली जाते. कमिशनिंग प्रक्रियेमध्ये नियोजन, निवडणूक उमेदवार- चिन्ह, मतदान केंद्रनिहाय प्रमाणीकरण सुसज्जता समाविष्ट आहे. यंत्र घटक जसे पाहिजे तसे काम करत आहेत याची खात्री करणे हा देखील कमिशनिंगचा उद्देश आहे. यावेळी प्रक्रिया पूर्ण करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व व्हिव्हिपॅट स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली. स्ट्राँग रूमची सुरक्षा सुव्यवस्थेच्यादृष्टीने २४ X ७ पॉवर बॅकअप, सशस्त्र बंदोबस्त आराखडा, पोलीस आदी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात करण्यात आल्या आहेत.

पशुसंवर्धन सचिव तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत

आता चौकशी करणार फ्लेमिंगोच्या मृत्यूची मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना नवी मुंबईतील १० फ्लेमिंगोच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबईतील खाडीत एका आठवड्यात १० फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता.  याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशनने केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंढे यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राहिलेले तुकाराम मुंढे हे सध्या महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाचे सचिव आहेत. कडक आणि प्रामाणिक IAS अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची प्रतिमा आहे. त्यांच्या 18 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत 20 वेळा बदली करण्यात आली आहे, अशा प्रामाणिक अधिकाऱ्याकडे चौकशी दिली याचा आम्हाला आनंद आहे, आम्हाला आनंद आहे, असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले. नवी मुंबईतील डीपीएस तलावाभोवती 10 फ्लेमिंगो मरण पावले  व  पाच फ्लेमिंगो जखमी झाले आहेत. फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी नवी मुंबईतील हा एक महत्त्वाचा सरोवर पाणथळ प्रदेश म्हणून ओळखला जातो. नवी मुंबई महापालिकेने स्वतः पाणथळ जागा फ्लेमिंगोचे निवासस्थान आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून संरक्षित करण्याची आवश्यकता होती. त्यासाठी पर्यावरण संस्था नॅटकनेक्ट फाऊंडेशन सहकार्य करणार होते. मात्र सिडकोने आतापर्यंत हे काम महापालिकेकडे देण्यास नकार दिला आहे. सिडकोने सुमारे 25 तलाव नागरी संस्थेकडे हस्तांतरित केले आहेत परंतु डीपीएस फ्लेमिंगो तलाव, एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ जागा राखून ठेवल्या आहेत.या जागा राखीव ठेवल्या आहेत. असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार यांनी सांगितले.

पाकिस्तानला जगासमोर उघडे पडणाऱ्या अँड. उज्वल निकम यांची उमेदवारी म्हणजे मुंबईकरांचा सन्मान

रमेश औताडे मुंबई : मुंबईत रेल्वेत बाँम्ब ब्लास्ट करुन मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या याकूब मेमनला फाशी व्हावी म्हणून न्यायालयात युक्तिवाद करणारे, मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला फाशी व्हावी म्हणून आवश्यक पुरावे व या कटातील पाकिस्तानचा सहभाग उघड करुन जगासमोर पाकिस्तानला उघडे पाडणारे अँड उज्वल निकम यांना लोकसभेची  उमेदवारी म्हणजे मुंबईकरांसाठी लढणाऱ्या सच्चा मुंबईकरांचा हा सन्मान असून उज्वल निकम हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार  अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला. उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार ज्येष्ठ विधितज्ञ अँड उज्वल निकम यांचा पक्ष प्रवेश करुन त्यांचे जोरदार स्वागत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केले. अँड उज्वल निकम म्हणजे एक सच्चा मुंबईकर आणि योध्दा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी प्रतिक्रिया अँड आशिष शेलार यांनी दिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अँड उज्वल निकम यांचे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विलेपार्ले येथील कार्यालयात ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अँड पराग अळवणी, शिवसेना नेते डॉ दीपक सावंत, विवेक पवार, माजी आमदार तृप्ती सावंत यांच्यासह युतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. उज्वल निकम यांनी आपल्या भाषणात ,  संधी देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय, प्रदेश अध्यक्ष आणि भाजपा मुंबई अध्यक्षांचे आभार मानले. ज्या पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाच्या विकासासाठी काम करीत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा बहुमान त्यांनी वाढवला ते पाहून आपल्याला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान समजतो, अशी भावना निकम यांनी व्यक्त केली.

रोहयो मजुरांना दुष्काळात आधार; सोयगाव तालुक्यात रोहयो मजुरांच्या खात्यावर ८६ ,लाख रु निधी जमा

सोयगाव : अती गंभीर दुष्काळ जाहीर झालेल्या सोयगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामावरील एक हजार आठशे ६४ मजुरांच्या खात्यात गुरुवारी ८६ लक्ष रु जमा झाले आहे त्यामुळे चार महिन्यातून पहिल्यादाच रोहयो मजुरांच्या मोबाईल वर रक्कम जमा झाल्याचे संदेश  गुरुवारी दुपारी एक वाजेपासून प्राप्त झाले होते. सोयगाव तालुक्यात पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेची आठशे दहा कामे मंजूर आहेत या कामांवरील मजुरांच्या हातांना मजुरी तर मिळाली होती परंतु  डिसेंबर ते मार्च या चार महिन्यापासून मजुरीच्या पोटी एक रुपयाही मिळाला नव्हता परंतु सोयगाव तालुक्यातील रोहयो च्या कामावरील एक हजार ८६४ मजुरांच्या खात्यावर थकीत मजुरी गुरुवारी दुपारपासून सुरू होण्यास प्रारंभ झाला आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ८६ लाख रक्कम रोहयो मजुरांच्या खात्यात वर्ग झाली आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यातील रोहयो मजुरांना दुष्काळात आधार मिळाला आहे वाढीव दरा नुसार रक्कम शासनाने रोहयो मजुरांना एक एप्रिल २०२४ पासून प्रति दिवस २७३ ऐवजी २९७ रु याप्रमाणे मजुरी देण्याचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी करत गुरुवारी जमा झालेल्या रक्कम मध्ये एक एप्रिल पासून रोहयो च्या कामावर असलेल्या मजूरांना प्रति दिवस २४ रु वाढीव दरा ने मजुरी अदा केली आहे त्यामुळे एक एप्रिल पासून रोहयो कामावर असलेल्या मजूरांना २९७ रु प्रति दिवस मजुरी मिळाली आहे सोयगाव चे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, रोहयो अभियंता सचिन चव्हाण, राहुल राठोड, रोहयो कार्यक्रम अधिकारी दत्ता कटके गणेश गवळी,गजानन फरकांडे,प्रकाश मोकसरे,संगणक परिचालक सुरेंद्र निकम,आदींनी पुढाकार घेतला आहे.