Month: April 2024

दामोदर पांडुरंग काळे यांचे निधन

सोयगाव : सोयगाव येथील जेष्ठ नागरिक दामोदर पांडुरंग काळे उर्फ  अण्णा (वय ७६) यांचे शनिवारी (दि.२७) दुपारी २.३० मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चयात पत्नी,दोन मुले, एक मुलगी,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. रविवारी (दि.२८) सकाळी ९ वाजाता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पत्रकार सुनील अण्णा काळे यांचे वडील होते.

काँग्रेस आणि वंचित एकत्र विधानसभा लढू शकतात, आता वंचितला मदत करा – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई : ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे. त्या विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते, तेव्हा नाराजी काढा आणि वंचित बहुजन आघाडीला मदत करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. आचारसंहिता असतानाही केंद्र शासनाने त्याचे उल्लंघन केले आहे आणि इथेनॉलवरील बंदी हटवली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 20 टक्के इथेनॉल वापरायची परवानगी काही वर्षांपूर्वी देण्यात आली होती. पण साखरेचे उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल  तयार करण्याची परवानगी काही जणांना देण्यात आली होती. याचे राजकारण आम्ही इचलकरंजी येथील सभेत मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या प्रमाणे दुसऱ्या टप्प्यात विदर्भात आणि मराठवाड्यात आम्हाला पाठिंबा मिळाला आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या भागात मिळत आहे. मुंबईमध्ये दोन दिवसांत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे करणार आहोत. मी असे म्हणेन की, काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिलेली आहे, पण त्यांचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिलेली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासंदर्भात म्हणावे लागेल की, बळी का बकरा काँग्रेसकडून दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उध्दव ठाकरे शिवसेना असे काही मतदारसंघ आहेत. त्यामध्ये काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराचे काम करत नाही आणि शिवसेना काँग्रेसच्या उमेदवारांचे काम करत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतदार हा आमच्याकडे वळला असल्याची परिस्थिती आहे.असे त्यांनी सांगितले. ॲड. आंबेडकरांनी भाजप आणि मोदी यांच्यावर ही निशाणा साधला ते म्हणाले की, 2014 पासून ते आतापर्यंत 17 लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे, असे सरकार स्वतःच म्हणत आहे. आम्ही असे म्हणतो की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत, तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे लोकांनी आता धडा घ्यावा. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका चालू होत्या, त्यावेळी याच चर्चेला सुरुवात झाली होती. नवीन सर्व्हेनुसार भाजप कुठेही 200 पार करत आहे, असे दिसत नाही. अमित शहा यांनी समान नागरी कायदा लागू करणार असे वक्तव्य एका सभेत केले होते यावर ॲड. आंबेडकर यांनी समान नागरी कायदा भाजपने करूनच दाखवावा. भाजप आणि आरएसएस स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल असे मला वाटत नाही. तो संसदेचा कायदा आहे. संविधानाने प्रत्येक धर्माला सुरक्षा दिलेली आहे. असे सांगितले.

माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार – उद्धव ठाकरे

रमेश औताडे मुंबई : देशात हुकूमशाही येता कामा नये, घटना बदलण्याचे काम सुरू असून त्याचे रक्षण करण्यासाठी ही लढाई आहे. महाविकास आघाडीचे राज्यात व देशात इंडिया आघाडीचे सरकार आले पाहिजे. माजी मंत्री वर्षाताई गायकवाड या मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्या कुठूनही लढू शकतात, वर्षा गायकवाड यांना माझे मत मिळणार आहे, पंजाच्या हातात मशाल आहे व त्यानंतर तुतारी वाजवणार असे म्हणत वर्षाताई गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार, असा विश्वास माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी वर्षाताई गायकवाड म्हणाल्या की, मातोश्री व ठाकरे यांच्याशी पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहेत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम केले असून त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतली. मुंबईतील महाविकास आघाडीच्या सहाही जागांवर विजय मिळवू असा विश्वास असून २००४ च्या लोकसभा निकालाची पुनरावृत्ती होईल, असे वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.

सोयगाव तालुक्यात उष्णतेची लाट

सोयगाव ते बनोटी मार्गावर शुकशुकाट तापमान ४३ अंशांवर; उकाड्याने नागरिक हैराण, रस्ते झाले सुनसान सोयगाव :दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे.सोयगावचा पारा शनिवारी  ४३ अंशावर   पोहोचला आहे.त्यामुळे सोयगावात तापमानाने उच्चांक गाठल्याने दुपारी अकरा  ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अंगाला उन्हाचे चटके बसत असत आहेत. त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. त्यामुळे सोयगाव-बनोटी मार्गावर शुकशुकाट दिसत आहे. उन्हाचा तीव्र झळांमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. मनुष्यांसह पशुपक्षांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोयगाव परिसरात दुपारी अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रस्त्यावर काम करणारे मजूर, प्रवासी वाहतूकदार, माल वाहतूकदांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम झाला आहे. दहा वाजेपासूनच उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत.सोयगाव परिसरात तीव्र उष्णता जाणवत असल्याने सोयगाव-बनोटी मार्गावर शुकशुकाट होता.त्यामुळे घरात आणि कार्यालयात दिवसभर पंखे लावून उन्हाच्या झळांपासून बचाव केला जात आहे, तर घराबाहेर जाताना टोपी, स्कार्प, गॉगल,सनकोट घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असा तज्ज्ञांकडून सल्ला दिला जात आहे. पंधरा दिवसापासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने रस्तेही निर्मनुष्य होवून तुरळक वाहने ये-जा करतांना दिसत आहेत. लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे नागरिक हैरान झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक मागील वर्षी पेक्षा यंदा उन्हाची तीव्रता अधिक असून ऐन लग्न सराईत रस्ते निर्मनुष्य झाले आहेत सोयगावचे तापमान गुरुवार ते शुक्रवार ४१ अंशावर असताना शनिवारी अचानक तापमानात दोन अंशांनी वाढ झाली आहे.

आठ अधिकाऱ्यांना मिळाले पोलिस महासंचालक पदक

नवी मुंबई : महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल राज्यातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक, पोलिस पदक आणि पोलिस शौर्य पदकासह पोलिस महासंचालकांचे बोधचिन्ह, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्राने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने २०२३ या वर्षातील उल्लेखनीय सेवेबद्दल महाराष्ट्रातील तब्बल ८०० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) जाहीर झाले आहे. यामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झालेल्यांमध्ये नवी मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील सहायक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल दगडू सापते, पोलिस हवालदार संदीप मनोहर ढवळे, गिरीष रामचंद्र किंद्रे, सतीश दत्तात्रय साळुंखे, गिरीष विनायक चौधरी, कृष्णा जयराम गावित आणि दत्तात्रय किसन भगत यांचा समावेश आहे. या सर्वांनी केलेल्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कळंबोली येथे पोलिस मुख्यालय येथे होणाऱ्या पथसंचालनावेळी या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.

दिव्यांग, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांत मतदान जागृती

पनवेल : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४च्या पार्श्‍वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत दिव्यांग व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये नुकताच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास स्वीप पथकप्रमुख शहर अभियंता संजय जगताप, दिव्यांग विभागप्रमुख प्रकाश गायकवाड, स्वप्नाली चौधरी उपस्थित होते. तसेच शुक्रवारी कामोठे येथे बचत गटांतील महिलांसाठी मतदान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी बचत गटाच्या महिलांनी रॅली काढली. प्रभाग समिती ‘ब’ हद्दीतील कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल इत्यादी ठिकाणी मतदान जनजागृतीचे बॅनर लावण्यात आले. आशा सेविकांनी सेक्टर पाच, कामोठे, साईनगर, दर्गा वाडी, नवीन पनवेल, कळंबोली येथे जनजागृती केली.

रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथके नेमण्यात यावीत

रोकड वाहतूक रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक खर्च निरिक्षकांचे निर्देश ठाणे : मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलगाड्यांमधून निवडणुक काळात रोख रक्कमेची वाहतूक होण्याची शक्यता व्यक्त करत असे प्रकार रोखण्यासाठी रेल्वे स्थानकांवर आरपीएफची पथकाची नेमणूक करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी ठाणे जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना बैठकीत दिले. मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीफची कुमक वाढवावी, अशी सुचनाही त्यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस भिवंडी मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चंद्र प्रकाश मीना आणि राहील गुप्ता उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. ठाणे, भिवंडी आणि कल्याण या लोकसभा मतदारसंघातील निवडणूका नि:पक्षपातीपणे, शांततेत आणि भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे. सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय ठेवावा, असे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी बैठकीत दिले. मुंबईची जीवनवाहिनी ही लोकल सेवा आहे. ठाणे, कल्याण, उल्हासनगर या परिसरात रेल्वे स्थानके आहेत. लोकल सेवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रोकडची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत रेल्वे स्थानकांवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याची सूचना निरिक्षकांनी बैठकीत केली. मतदानाचे शेवटचे चार दिवस हे अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीएफची कुमक वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले. भिवंडी, ओवळा – माजिवडा हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीत असताना जर एखादी बाब आपल्या अखत्यारित नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आल्यास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कळविण्यात यावे. सर्वजण करीत असलेले निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकांने काम करावयाचे आहे, असेही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही निरीक्षकांनी घेतला. लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले.

श्री नारायण गुरु कॉलेज कॅरम स्पर्धेत पौरस करगुटकर विजेता

मुंबई : खालसा कॉलेजच्या पौरस करगुटकरने श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स-चेंबूर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतर कॉलेज एकेरी कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. विविध जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या ज्युनियर कॅरमपटूनी निर्णायक फेऱ्यांमध्ये चुरशीचा खेळ केल्यामुळे स्पर्धा रंगतदार झाली. अंतिम फेरीत पौरस करगुटकरने मॉडेल कॉलेज-डोंबिवलीच्या समृध्दी घाडीगावकरचे आव्हान २-० असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. श्री नारायण गुरु कॉलेज समितीचे अध्यक्ष एम.आय.दामोदरन व जनरल सेक्रेटरी ओ.के. प्रसाद, उपप्राचार्य डॉ. जयश्री व्यंकटअचलम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी स्पोर्ट्स डायरेक्टर प्रोफेसर पूनम मुजावर, स्पोर्ट्स प्रोफेसर रेश्मा खुदाबक्ष, प्रोफेसर नाहीद शेख, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व प्रॉमिस सैतवडेकर, कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. निर्णायक फेरीतील पहिल्या सेटमधील पहिलाच बोर्ड ५-० असा घेत समृध्दी घाडीगावकरने पौरसविरुध्द दमदार प्रारंभ केला. परंतु त्यानंतर सावध व अचूक खेळ करून प्रत्येक बोर्ड घेत पौरस करगुटकरने पहिला सेट ८-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये राणीवर सतत कब्जा मिळवीत पौरसने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि १५-२ असा विजय मिळवीत अंतिम फेरी जिंकली. राष्ट्रीय ख्यातीचे उदयोन्मुख कॅरमपटू अंकित मोहिते व निलांश चिपळूणकर यांना हरवून समृध्दी घाडीगावकरने निर्माण केलेली विजेतेपदाची दावेदारी अखेर फोल ठरली आणि तिला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पौरस करगुटकरने पोद्दार कॉलेजच्या रुची माचीवलेचा ७-१०, १३-०, १३-७ असा तर समृध्दी घाडीगावकरने हिंदुजा कॉलेजच्या निलांश चिपळूणकरचा ८-६, ९-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. विविध जिल्ह्यातील कॉलेज कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटू गोविंदराव मोहिते अमृत महोत्सवी चषक आंतर कॉलेज कॅरम स्पर्धेचे आयोजन २९ जूनला आयडियलतर्फे होणार असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते व संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.

३७वी श्रीधर देशपांडे स्मृती टी -२० समरलीग क्रिकेट स्पर्धा

आर्यनचे बळींचे सप्तक ठाणे : आर्यन दलालच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्यामुळे यजमान स्पोर्टींग क्लब कमिटी संघाने सलग दुसरा मोठा विजय मिळवत ३७ व्या श्रीधर देशपांडे स्मृती टी -२० समरलीग क्रिकेट स्पर्धे च्या बाद फेरीत स्थान मिळवले. आर्यनने सात बळी मिळवत मुंबई क्रिकेट अकॅडमीला अवघ्या ४९ धावांवर गुंडाळल्यावर यजमानांनी ४.२ षटकात एका फलंदाजांच्या मोबदल्यात ५३ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा यजमानाच्या कर्णधाराचा निर्णय आर्यनने  एकदम सार्थ ठरवला. आर्यनने केवळ १९ धावांच्या मोबदल्यात सात फलंदाजाना माघारी पाठवले. आर्यनच्या गोलंदाजीसमोर मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या दोघांच फलंदाजांना दुहेरी धावांचा पल्ला पार करता आला. विक्रम पैच्या १४ आणि अक्षत कांबळेच्या १० धावांमुळे मुंबई क्रिकेट अकॅडमीच्या खात्यात बऱ्यापैकी धावा जमा झाल्या. त्यांनतर शंकर सुब्रमणियमने १० चेंडूत तीन चौकार मारत नाबाद १६ धावा केल्या. तर पहिल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या अथर्व अधिकारीने १३ चेंडूत पाच चौकारासह नाबाद २४ धावांची खेळी केली. संक्षिप्त धावफलक : मुंबई क्रिकेट अकॅडमी : १२ षटकांत सर्वबाद ४९ ( विक्रम पै १४, अक्षत कांबळे १० , आर्यन दलाल ४-१-१९-७, यश जठार ३-०-१२-२, तुषार कार्विझया २-०-६-१) पराभूत विरुद्ध स्पोर्टींग क्लब कमिटी : ४.२ षटकात १ बाद ५३ (शंकर सुब्रमणियम नाबाद १६, अथर्व अधिकारी नाबाद २४, शिवेन मिश्रा २-०-१९-१).

पॉवरलिफ्टिंग खेळाचा प्रशिक्षण वर्ग

मुंबई : येत्या ६ ते २० मे दरम्यान ठाणे (पूर्व) येथील धि युनायटेड स्पोर्ट्स क्लबमध्ये सर्व वयोगटातील मुला-मुलींसाठी पॉवरलिफ्टिंग खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती पुरस्कार प्राप्त नामवंत पॉवरलिफ्टिंग खेळाडू अनंत चाळके यांच्यातर्फे या खेळाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी या खेळाकडे आकर्षित व्हावे हा या प्रशिक्षण वर्गाचा मूळ हेतू आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९३२४५०६०६६ अथवा ९७०२१७१००४ यावर संपर्क साधावा.